पार्थनंतर अजितदादांचा दुसरा मुलगाही अडचणीत?

    दिनांक :07-Nov-2025
Total Views |
मुंबई
Ajitdada's second son is also in trouble राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबावर पुन्हा गंभीर आरोपांचा भडिमार सुरू झाला आहे. पार्थ पवार यांच्या कंपनीने तब्बल १,८०० कोटी रुपयांच्या बाजारभावाची जमीन फक्त ३०० कोटी रुपयांत विकत घेतल्याच्या वादावर राजकीय वर्तुळ आधीच अस्वस्थ असतानाच आता अजित पवार यांच्या दुसऱ्या मुलावरही काँग्रेसने थेट भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणात अजित पवारांवर थेट निशाणा साधत त्यांच्यावर डबल भ्रष्टाचार करण्याचा आरोप केला आहे.
 
 
 
Ajitdada
सपकाळ यांनी सांगितले की, अजित पवारांनी स्वतःच्या संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी आणि तुरुंगवास टाळण्यासाठी भाजपात प्रवेश केला. मात्र, सत्तेत गेल्यानंतरही त्यांचा कारभार बदललेला नाही. ते स्वतः दस नंबरचे बनून बसले आहेत, पण आपल्या दोन्ही मुलांकडून दोन नंबरचे धंदे करवून घेतात, असा थेट हल्ला सपकाळ यांनी चढवला. काँग्रेसने आरोप केला की, अजित पवारांच्या एका मुलाचा भ्रष्टाचार पुण्यातील जमिनीच्या व्यवहारात दिसून आला, तर दुसरा मुलगा दारू व्यवसायात गुंतलेला आहे. ‘टँगो’ नावाच्या देशी दारू कंपनीद्वारे आर्थिक फायद्यासाठी अजित पवारांनी अनेक निर्णय घेतले असल्याचा दावा सपकाळ यांनी केला. या कंपनीला संरक्षण मिळावे म्हणूनच अजित पवारांनी अबकारी खात्याचे मंत्रिपद स्वतःकडेच ठेवले, जेणेकरून आपल्या मुलाच्या व्यवसायाला थेट फायदा मिळेल, असा त्यांचा आरोप होता. “राज्यात डबल धमाका, डबल भ्रष्टाचार आणि डबल नंबरचे काम सुरु आहे, असे सपकाळ यांनी उपरोधिकपणे म्हटले.
 
 
याच पार्श्वभूमीवर त्यांनी अजित पवारांवर आणखी टीका करताना म्हटले की, “शेतकरी कर्जमाफीसाठी आक्रोश करत आहेत, पण अजित पवार त्यांच्या समस्यांकडे डोळेझाक करत आहेत. स्वतःच्या जिल्ह्यात मुलाच्या फायद्यासाठी स्टॅम्प ड्युटी माफ केली जाते. अजित पवारांना ‘भस्म्या’ नावाचा आजार झाला आहे कितीही खाल्ले तरी अजून खाण्याची इच्छा थांबत नाही,” अशा शब्दांत त्यांनी थेट निशाणा साधला. दरम्यान, पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रकरणानंतर विरोधकांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी अधिक तीव्र केली आहे. शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी एक्स वर पोस्ट करून म्हटलं आहे की, मुलगा पुण्यात ३०० कोटींचा व्यवहार करतो आणि पित्याला त्याची कल्पना नाही, हे विश्वास ठेवण्यासारखं नाही. जेव्हा वडील त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, तेव्हा अशी जमीन व्यवहारातील अनियमितता कशी घडते?” त्यांनी आठवण करून दिली की, अशाच प्रकारच्या आरोपांवरून खडसे यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे नैतिकता दाखवत अजित पवारांनीही राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, “कोरेगाव पार्क जमीन व्यवहाराची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री एक स्वतंत्र समिती स्थापन करावी,” अशी मागणीही त्यांनी केली आहे. या सर्व घटनांमुळे अजित पवार कुटुंब पुन्हा राजकीय वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे आणि विरोधकांनी “भ्रष्टाचाराच्या डबल खेळीचा” ठपका ठेवत पवारांच्या भविष्यातील अडचणींचे संकेत दिले आहेत.