हिंगणघाट,
Akash Avatare : महिला नगराध्यक्ष व ४० नगरसेवकांसाठी २ डिसेंबर रोजी हिंगणघाटात मतदान होणार आहे. शहरातील ९४ हजार ३५९ मतदार थेट नगराध्यक्षासह एका प्रभागातील २ सदस्यांची निवड करतील. त्यासाठी प्रशासनाने पुर्व तयारी केली असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी आकाश अवतरे यांनी आज ७ रोजी उपविभागीय कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांची उपस्थिती होती.

मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात १०४ मतदान केंद्र आहेत. शहरात ९४ हजार ३५९ मतदार आहेत. यात ४७ हजार २६७ पुरुष तर ४७ हजार ९२ महिला मतदार आहे. विशेष म्हणजे वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट नगरपरिषदमध्ये सर्वात जास्त मतदार असल्याची माहिती अवतारे यांनी दिली. शहरात २० प्रभागातून ४० नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. प्रभाग ५ मध्ये सर्वात जास्त म्हणजे ५७७८ मतदार आहे तर प्रभाग ४ मध्ये ३७७३ एवढे म्हणजे सर्वात कमी मतदार आहेत. मतदार यादी १ जुलैपर्यंत नोंदणी झालेल्या मतदाताच्या आधारावर तयार केली आहे. या मतदारांपैकी १६४५ मतदार संशयित मतदाताच्या श्रेणीमध्ये येत असून याबद्दल शहानिशा करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. निवडणूक यंत्रणेने चार अधिकार्यांचे भरारी पथक तयार केले आहे. उमेदवारांना नामांकन पत्र ऑनलाईन पद्धतीने भरावे लागेल. निवडणुकी दरम्यान कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही असेही त्यांनी सांगितले.
येथील नगरपरिषद च्या सभागृहामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेत परिविक्षाधीन उपविभागीय अधिकारी नरवटे, ठाणेदार अनिल राऊत, विशाल ब्राह्मणकर, प्रशासकीय अधिकारी ढबाळे, आदी उपस्थित होते.