अमरावती,
Pragya Prabodhani : पारधी समाजासाठी कार्य करणार्या अमरावती शहरातील प्रज्ञा प्रबोधनी या संस्थेला स्व. डॉ. रमेश गोडबोले पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. २३ नोव्हेंबरला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
स्थानिक राजापेठ येथील अमरावती श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रपरिषदेत डॉ. रमेश गोडबोले स्मृति प्रतिष्ठानच्या वतीने याबाबतची माहिती देण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष प्रा. मोहन काटे, सहसचिव सोपान गोडबोले, विश्वस्त अतुल गायगोले, विवेक घळसासी, उदय पर्वतकर व रवींद्र देशपांडे उपस्थित होते. यावेळी प्रा. मोहन कोकाटे व विवेक घळसाशी यांनी सांगितले की, डॉ. रेमश गोडबोले यांचे नाव विदर्भात सुपरिचित आहे. वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी आपल्या अविरत सेवानी नावलौकिक प्राप्त केला होता. बडनेरा येथील जुन्या वस्तीतील त्यांच्या रुग्णालयात समाजातील सर्व स्तरातील रुग्णांना उत्तम वैद्यकीय उपचार मिळायचे. संपूर्ण आयुष्य डॉ. रमेश गोडबोले यांनी अत्यल्प दरात रुग्णसेवा केली.
डॉ. रमेश गोडबोले यांचा वैद्यकीय सेवेसोबतच धर्म कार्यातही व आध्यात्मिक क्षेत्रात पुढाकार असायचा. व्यक्तीशः उत्तम कीर्तनकार असल्याने त्यानी अनेक मंदिरात आपली कीर्तन सेवा प्रस्तुत केली. त्यांनी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी देखील समर्थपणे सांभाळली. बडनेरा येथे त्यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनात अद्ययावत अशी संत गाडगेबाबा रक्तपेढी सुरू करण्यात आली. त्यांच्या निकटवर्तीयानी सेवा तसेच आध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्ती किवा संस्थाना स्व. डॉ. रमेश गोडबोले स्मृती सेवा पुरस्कार देऊन गौरवान्वित करण्यास सुरुवात केली असून पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. रमेश गोडबोले स्मृति प्रतिष्ठानच्या अंतर्गत करण्यात येत असते.
पुरस्काराचे स्वरुप १ लक्ष रूपयाची गौरव राशी, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे असणार आहे. गत वर्षीचा पुरस्कार संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटला देण्यात आला होता. यावर्षीचा पुरस्कार अमरावती येथील सेवा प्रकल्प प्रज्ञा प्रबोधिनीला देण्याचे निवड समितीने एकमताने ठरविले आहे. प्रज्ञा प्रबोधिनी ही संस्था अमरावती जिल्ह्यातील पारधी समाजासाठी मागील २२ वर्षापासून सेवा कार्य करीत आहे. जिल्ह्यातील जवळपास ३५ पारधी बेड्यांवर संस्थेचा संपर्क असून तेथे संस्थेमार्फत आरोग्य रक्षक योजना, कृषी सहाय्यता योजना, सांस्कृतिक कार्यक्रम, दीपावली मिलन, आरोग्य शिबिरे असे अनेक उपक्रम राबविले जातात. यावर्षी पुरस्काराचे वितरण रविवार २३ नोव्हेंबर रोजी स्थानिक हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या स्व. सोमेश्वर पुसतकर सभागृहामध्ये सायंकाळी पाच वाजता आचार्य जितेंद्रनाथ महाराजांच्या हस्ते होणार आहे. शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित रहावे असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.