राज्यभरातील शाळा २४ नोव्हेंबरला बंद

टीईटी सक्तीविरोधात शिक्षक संघटनांचा निर्णय

    दिनांक :07-Nov-2025
Total Views |
अमरावती, 
amravati-school-closed : राज्यातील विविध शिक्षक संघटनांच्या संयुक्त पुढाकाराने मंगळवारी रावसाहेब पटवर्धन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पुणे येथे राज्यभरातील शिक्षकांच्या गंभीर प्रश्नांवर विचारविनिमय बैठक आयोजित करण्यात आली होती. ’सर्वोच्च न्यायालयाच्या १ सप्टेंबरच्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) सक्तीच्या निर्णयाविरोधात राज्य शासनाने तातडीने पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि केंद्र शासनाकडे याबाबत पाठपुरावा करावा. दोन आठवड्याच्या आत याबाबत कार्यवाही झाली नाही, तर २४ नोव्हेंबर रोजी राज्यभरातील शिक्षक शाळा बंद आंदोलन करतील,’ असा इशारा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना व महाराष्ट्र राज्य महानगरपालिका व नगरपालिका प्राथमिक शिक्षक संघटना यांनी मंगळवारी दिला. दरम्यान, आंदोलनानंतरही पुनर्विचार याचिका दाखल झाली नाही, तर संघटना थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
 
 
school
 
कार्यकारी अध्यक्ष सचिन डिंबळे, प्राथमिक शिक्षक समितीचे पदाधिकारी उदय शिंदे, शिक्षक संघाचे संभाजी थोरात, शिक्षक आणि शिक्षकेतर संघटनेचे राज्यनेते शिवाजीराव खांडेकर, राज्य शिक्षक समितीचे सरचिटणीस राजन कोरगावकर, राज्य शिक्षक समितीचे कोषाध्यक्ष नंदकुमार होळकर, राज्य शिक्षक समिती उपाध्यक्ष राजन सावंत, राज्य शिक्षक संघांचे मुख्य सल्लागार मधुकर काठोळे, राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे वितेश खांडेकर यांच्यासह अन्य संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ’टीईटी’ सक्तीचा निर्णय लागू करताना अनुभवी शिक्षकांना संरक्षण देण्यात यावे, त्यांच्या सेवा-सुविधांवर गदा येऊ नये, अन्यथा शिक्षण क्षेत्रात मोठा असंतोष उसळेल. याबाबत गांभीर्याने विचार करून त्वरित पावले उचलावीत, असे आवाहन शिक्षक संघटनांनी केले असल्याचे प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांनी कळविले आहे.