ब्रम्हपुरीतील वाघाच्या ‘त्या’ हल्ल्याची चित्रफित बनावट

*वनविभागाचे स्पष्टीकरण

    दिनांक :07-Nov-2025
Total Views |
चंद्रपूर, 
brahmapuri-tiger : ब्रम्हपुरी वनविभागातील वनविश्रामगृह येथे वाघाच्या हल्ल्यात एक व्यक्ती ठार झाल्याची कथित चित्रफित सामाजिक माध्यमावर मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत आहे. या ‘व्हिडीओ’बाबत चंद्रपूर वनविभागाने स्पष्ट केले आहे की, ब्रम्हपुरी वनविभागात अशा प्रकारची कोणतीही घटना घडलेली नाही.
 
 
jjlk
 
वनविभागाच्या माहितीनुसार, संबंधित व्हिडीओ पूर्णपणे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने तयार केलेला आहे. या व्हिडीओद्वारे समाजकंटकांकडून जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा आणि सत्यविरहित अफवा पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. अलीकडील काळात ब्रम्हपुरी परिसरात मानव-वन्यजीव संघर्षाच्या काही घटना घडल्या असल्या तरी, या बनावट व्हिडीओचा त्याच्याशी काहीही संबंध नसल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.
 
 
मुख्य वनसंरक्षक (प्रा.) आर. एम. रामानुजम यांनी सांगितले की, या व्हिडीओची निर्मिती व प्रसारण करणार्‍यांविरुद्ध विभागाने गंभीर दखल घेतली असून, कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. अशा प्रकारच्या खोट्या व दिशाभूल करणार्‍या व्हिडीओंवर विश्वास ठेवू नये. अशा माहितीची नोंद आढळल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या वनविभाग किंवा पोलिस विभागास माहिती देऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.