वर्धा,
hindi-vishwa-vidyapeeth : दिल्ली येथील जवाहर लाल नेहरू विद्यापिठात झालेल्या निवडणुकीत डाव्या विचाराच्या संघटनेचा विजय झाल्याचा जल्लोष वर्धेतील महात्मा गांधी आंतर राष्ट्रीय हिंदी विश्व विद्यापिठात साजरा करण्यात आला. यावेळी लाल सलाम लाल सलाम असे नारे देत असताना स्वातंत्र्यवीर सावरकारांच्या विरोधातही नारेबाजी करण्यात आली. या घटनेचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकार्यांनी तीव्र शब्दा निषेध करीत सावरकरांचा विरोध करणार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. या मागणीचे निवेदन विद्यापीठ प्रशासनालाही देण्यात आले.
अभाविपने विद्यापीठ प्रशासनाला दिलेल्या निवेदनात नमुद केल्यानुसार, ६ रोजी रात्री १० वाजतानंतर डाव्या विचारांच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिसरात रॅली काढून जाहीरपणे ‘माफ करा, माफ करा सावरकर’ अशा अपमानजनक घोषणा देत सावरकरांविरुद्ध अपशब्द वापरले. परिषदेने हे विद्यापीठाच्या प्रतिष्ठेवर, शिस्तीवर आणि थोर पुरुषांंवर थेट हल्ला असल्याचे म्हटले आहे.
रॅलीमध्ये सहभागी असलेल्यांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, भविष्यात अशा घटना होऊ नये यासाठी बंदी घालावी आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी. विद्यापीठ प्रशासनाने त्वरित आणि ठोस कारवाई केली नाही तर प्रशासनाच्या निष्क्रियतेविरुद्ध आंदोलन करावे लागेल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला. या प्रकाराविषयी शहरातील विविध संघटनांनी नाराजी व्यत केली आहे.
तो जेएनयूतील विजयाचा जल्लोष होता : कुलगुरू
या संदर्भात कुलगुरू कुमुद शर्मा यांच्यासोबत भ्रमणध्वीवर संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, आपण बाहेर राज्यात आहोत. परंतु, दिल्ली येथील जेएनयू विद्यापिठातील निवडणुकीतील विजयाचा जल्लोष विद्यापीठ परिसरात झाल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे. परंतु, सावरकरांचा अपमान करणार्या घोषणा दिल्या गेल्या याविषयी आपल्याला माहिती नाही. थोर पुरुषांचा अपमान होईल अशी प्रेरणा आमचे विद्यापीठ देत नाही. महापुरुषांचा अपमान होणार नाही याची काळजी घेतल्या जाईल असे त्यांनी तरुण भारत सोबताना सांगितले.