नवी दिल्ली,
inaugurates Vande Mataram Memorial भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा देणाऱ्या राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम’च्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभर चालणाऱ्या विशेष स्मारक उपक्रमाचे नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम येथे उद्घाटन केले. या सोहळ्यात पंतप्रधानांनी स्मारक तिकीट आणि नाणे जारी करत राष्ट्रगीताला सलाम केला. या उपक्रमाअंतर्गत देशभरात वंदे मातरमच्या संपूर्ण आवृत्तीचे सामूहिक गायन आयोजित केले जाणार आहे. हा विशेष कार्यक्रम ७ नोव्हेंबर २०२५ ते ७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पार पडणार असून, भारतभर वर्षभर विविध ठिकाणी “वंदे मातरम”चे एकत्रित गायन आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. दररोज सकाळी ९:५० वाजता देशभरातील लोक सार्वजनिक ठिकाणी उभे राहून वंदे मातरमच्या संपूर्ण आवृत्तीचे गायन करतील. या उपक्रमामध्ये विद्यार्थी, शेतकरी, कामगार, कलाकार, सैनिक आणि सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग अपेक्षित आहे.

पंतप्रधान मोदी यांनी या प्रसंगी भाषणात म्हटलं की, वंदे मातरम हे केवळ गाणं नाही, तर ती भारतमातेची स्तुती आहे. हे गीत भारतीयांच्या आत्म्याला, श्रद्धेला आणि राष्ट्रभक्तीला जागं करतं.”त्यांनी पुढे सांगितलं की, देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात हे गाणं गुंजणं म्हणजे एकात्मतेचा उत्सव असेल. वंदे मातरमचा इतिहासही तेवढाच प्रेरणादायी आहे. ७ नोव्हेंबर १८७५ रोजी अक्षय नवमीच्या दिवशी बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी हे गीत रचले. नंतर ते त्यांच्या प्रसिद्ध कादंबरी ‘आनंदमठ’ मध्ये समाविष्ट करण्यात आले. त्या काळात हे गाणे ब्रिटिश राजवटीविरुद्ध भारतीयांच्या स्वाभिमानाचे प्रतीक ठरले. स्वातंत्र्यलढ्यातील असंख्य आंदोलनांत हे गीत प्रेरणेचा श्वास ठरले.
वंदे मातरममध्ये मातृभूमीला शक्ती, समृद्धी आणि दिव्यतेचं प्रतीक मानलं आहे. या गीताने भारतीय जनतेच्या मनात देशभक्तीचा ज्योत प्रज्वलित केली आणि आजही ती तेवढ्याच उत्साहाने पेटलेली आहे. या स्मारक वर्षाच्या निमित्ताने केंद्र सरकारकडून विविध सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. शाळांमध्ये विशेष प्रबोधन सत्रं, युवकांसाठी वंदे मातरम स्पर्धा आणि कलात्मक प्रदर्शनांचाही या उपक्रमात समावेश असेल. भारताच्या राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक ठरलेल्या ‘वंदे मातरम’च्या १५० वर्षांच्या स्मरणोत्सवाने देशभरात पुन्हा एकदा देशभक्तीचा नवा संकल्प जागवण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.