केळझरच्या गणेशकुंडात तरुणीचा मृतदेह

    दिनांक :07-Nov-2025
Total Views |
सेलू, 
keljar-ganeshkund : तालुक्यातील केळझर येथील सिद्धिविनायक गणपती मंदिर परिसरातील गणेशकुंडात तरुणीचा मृतदेह आढळून आला. साक्षी देहारे (२०) वर्धा येथील सिंदी मेघे परिसरातील रहिवासी असल्याचे पुढे आले आहे. ही घटना आज ७ रोजी दुपारी १२.४० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
 
 
 
j
 
 
 
साक्षी वर्धेतील एका कॅफेमध्ये काम करत होती. ६ रोजी साक्षी घरी एकटीच होती. गुरुवारी ती केळझर येथे गेली होती. गावात तिचे नातेवाईक असूनही तिथे न जाता ती थेट सिद्धिविनायक गणपती मंदिर परिसरात आली. दुपारी ३.३० वाजता तिने गणेशकुंड विहिरीचा फोटो आपल्या मित्र भरत याला पाठवला. भरतने तात्काळ ही माहिती साक्षीच्या कुटुंबीयांना दिली. कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध केली. परंतु, साक्षी मिळाली नाही.
 
 
त्यामुळे वर्धा पोलिस ठाण्यात साक्षी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. आज ७ रोजी पोलिस पाटील प्रकाश खंडाळे यांनी मंदिरातील गणेशकुंडात डोकावून पाहिले असता त्यांना बॅग पाण्यावर तरंगताना दिसली. त्यांनी त्वरित ही माहिती सेलू पोलिसांना दिली. ठाणेदार मनोज गभने, जमादार गणेश राऊत, देवा वणवे, लोकेश पवनकर घटनास्थळी पोहोचले. कुंडात शोध घेतला असता साक्षीचा मृतदेह २ तासांनी गवसला.
 
 
या घटनेची वार्ता परिसरात वार्‍यासारखी पसरल्याने घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. साक्षीच्या मृत्यूचे कारण कळू शकले नाही. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे.