बुलढाणा,
kiran-patil : जिल्ह्यातील ११ नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या असून या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी तयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी निवडणूक पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी सूक्ष्म नियोजन करुन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले.
या आढावा बैठकीला अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसिलदार, जिल्हा सह आयुक्त पेंटे आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी आदर्श आचारसंहिता, प्रतिबंधात्मक आदेश, मनुष्यबळाचे व्यवस्थापन, मतदान आणि मतमोजणी विषयक तयारी, अधिकारी, कर्मचार्यांच्या नियुक्त्या, विविध भरारी पथकांच्या नियुक्त्या, मतदान केंद्रांवरील सोयीसुविधा, बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट वाटपाचे व्यवस्थापन, मतमोजणी केंद्रावरील सोयीसुविधा, कायदा व सुव्यवस्था, विविध समित्यांच्या नेमणुका आदी विषयांचा आढावा घेवून सविस्तर चर्चा करण्यात आली.
नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने यंत्रणा सज्ज ठेवावे. आचारसंहिता लागू झाल्यामुळे प्रतिबंधात्मक आदेश जारी करावे. मतदान केंद्रांवरील सोयीसुविधांची खात्री करावी. अधिकारी, कर्मचार्यांच्या नियुक्त्या कराव्या. प्रचाराला सुरुवात होण्यापूर्वी विविध भरारी पथके कार्यान्वित करावी. नियंत्रण कक्ष स्थापन करुन मतदारांसाठी मदत क्रमांक जारी करावे. नगरपरिषद निवडणुकांसह जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निवडणुक निर्णय अधिकार्यांनी सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी या बैठकीत दिले.