हैद्राबाद,
Rashmika-Vijay's wedding दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक चर्चेत असलेले जोडपे रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून दोघांच्या नात्याबद्दल अनेक अफवा आणि चर्चा रंगत होत्या. दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकल्याची माहिती नुकतीच समोर आली होती. आता या जोडप्याच्या लग्नाची तारीख ठरल्याची चर्चा सोशल मीडियावर जोरदारपणे सुरू आहे. चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी ठरत असून, दोघेही नव्या वर्षात लग्नबंधनात अडकणार असल्याचे सांगितले जात आहे.
माध्यमांच्या अहवालानुसार, रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांचा शाही विवाहसोहळा २६ फेब्रुवारी २०२६ रोजी राजस्थानातील उदयपूर येथील एका आलिशान राजवाड्यात पार पडणार आहे. तथापि, या संदर्भात रश्मिका किंवा विजय देवरकोंडाने अधिकृतरीत्या कोणतीही घोषणा केलेली नाही. तरीसुद्धा, दोघांच्या लग्नाच्या तारखा आणि स्थळ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
एका रिपोर्टनुसार, रश्मिका आणि विजय दोघेही आपल्या कुटुंबीयांच्या आणि काही जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्नबंधनात अडकतील. या शाही सोहळ्यात दोन्ही दक्षिण भारतीय आणि भारतीय पारंपरिक पद्धतींचे विधी पार पडणार आहेत. विजयच्या एका जवळच्या मित्राने माध्यमांना सांगितले की, दोघेही शांत, पारंपरिक पण भव्य विवाहसोहळ्याचे नियोजन करत आहेत. गेल्या महिन्यात विजयच्या हैदराबादमधील घरी या जोडप्याचा साखरपुडा पार पडल्याची माहिती समोर आली होती. त्या प्रसंगी फक्त कुटुंबीय आणि काही निवडक मित्र उपस्थित होते. ‘थामा’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान रश्मिकानेही या नात्याबद्दल सूचक इशारा दिला होता. विजयच्या टीमनेदेखील सांगितले की, दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकतील.