वर्धा,
Sandeep Patil : भारताने नेहमीच कठीण परिस्थितीत आपल्या एकतेचे सामर्थ्य दाखवले आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या प्रवासात देशासमोर आलेल्या समस्या संविधानाच्या चौकटीत राहून सोडविता येतात हे आपण प्रत्यक्ष पाहिले आहे. भारताच्या संविधानात प्रत्येक प्रकारच्या आव्हानाचे समाधान करण्याची क्षमता आहे, असे प्रतिपादन नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी केले.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यापिठाच्या गालिब सभागृहात आयोजित ‘राष्ट्रीय एकतेचे वर्तमान आव्हाने’ या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. कुमुद शर्मा होत्या. व्यासपीठावर पोलिस अधीक्षक अनुराग जैन व कुलसचिव कादर नवाज खान उपस्थित होते.
पाटील पुढे म्हणाले की, माओवादी समस्येशी लढा देत असताना काही प्रमाणात नियंत्रण मिळवले आहे. परंतु, ती पूर्णपणे संपविण्यासाठी देशातील तरुण आणि नागरिकांनी जागरूक होणे आवश्यक आहे. राजकीय किंवा इतर सामाजिक समस्या संविधानाच्या मर्यादेत राहून सोडवल्या पाहिजेत. विकासातील अडथळे दूर झाले तरच आपण विकसित भारताच्या स्वप्नाची पूर्तता करू शकू. लोकसहभाग हाच विकसित भारताचा पाया आहे. स्वातंत्र्याच्या काळात महात्मा गांधींनी अहिंसा आणि शांततेच्या माध्यमातून लढा दिला, जो जागतिक इतिहासातील एक मोठा क्रांतिकारक टप्पा होता, असेही ते म्हणाले.
कुलगुरू प्रा. कुमूद शर्मा म्हणाल्या की, विकासाच्या मार्गावर भारताने नेहमीच धैर्य आणि दृढनिश्चय दाखवला आहे. त्या प्रवासात सरदार पटेल यांनी एक महत्त्वाचा स्तंभ म्हणून कार्य केले. देशाच्या एकतेसाठी अधिक सजगता, सतर्कता आणि सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. जबाबदार नागरिक म्हणून देशाच्या एकतेचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे. अखंड भारतासाठी भाषा, साहित्य, कला आणि धर्म हेच असे सूत्र आहेत जे आपल्याला एकतेच्या माळेत बांधून ठेवतात. आपण उदारता, सर्वसमावेशकता आणि परस्पर पुरकतेची संस्कृती जोपासली पाहिजे. विभाजनाची प्रवृत्ती बाळगणार्यांना ठामपणे प्रत्युत्तर द्यायला हवे. गांधीजींकडे कोणतेही शस्त्र नव्हते. लोकांचा विश्वास, आस्था आणि संबल हेच त्यांचे बल होते. आपले ऋषी आणि ग्रंथ हीच आपली खरी संपत्ती असून विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याचा संकल्प आपण सर्वांनी करावा, असेही म्हणाल्या.
संचालन प्रा. डॉ. जयंत उपाध्याय यांनी तर डॉ. राकेश मिज्ञ यांनी आभार मानले.