नवी दिल्ली,
Sleep is mandatory for women झोप ही आपल्या शरीरासाठी जीवनदायिनी आहे, दिवसाच्या थकव्याला विसरून पुन्हा नव्या ऊर्जेसह दिवसाची सुरुवात करण्यासाठी पुरेशी झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे. अलीकडच्या वैज्ञानिक संशोधनातून असे समोर आले आहे की, महिलांना पुरुषांपेक्षा थोडी अधिक झोप आवश्यक असते. अभ्यासानुसार, महिलांना सरासरी पुरुषांपेक्षा १० ते १५ मिनिटं जास्त झोप घेणे गरजेचे असते. या फरकामागचे प्रमुख कारण म्हणजे महिलांच्या शरीरातील हार्मोनल बदल आणि त्यांच्या घरगुती तसेच व्यावसायिक जबाबदाऱ्या.
तज्ज्ञांच्या मते, महिलांच्या शरीरात दर महिन्याला मासिक पाळी, गर्भधारणा आणि मेनोपॉजसारखे हार्मोनल बदल होतात. या काळात शरीरात हार्मोनल चढउतार झाल्याने झोपेचा पॅटर्न बिघडतो आणि शरीराला पूर्ण विश्रांती मिळवण्यासाठी अधिक झोप आवश्यक ठरते. गर्भधारणेदरम्यान झोपेचा दर्जा कमी होतो, तर मेनोपॉजच्या काळात अनिद्रा आणि झोप न लागणे ही सामान्य समस्या बनते. म्हणून महिलांनी झोपेच्या वेळेला गांभीर्याने घेणे आणि ठरावीक वेळेवर विश्रांती घेणे अत्यंत गरजेचे आहे.
आजच्या काळात महिला घरगुती कामासोबतच नोकरी, व्यवसाय आणि कुटुंबातील जबाबदाऱ्या सांभाळतात. सततच्या शारीरिक आणि मानसिक ताणामुळे मेंदू थकतो आणि शरीराला पुनः ऊर्जा मिळवण्यासाठी अधिक झोपेची आवश्यकता निर्माण होते. झोपेची कमतरता मूड, एकाग्रता आणि हार्मोनल संतुलनावरही परिणाम करते. नियमित झोप घेतल्यास मूड चांगला राहतो, रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि मानसिक आरोग्य सुधारते. तज्ज्ञांचा सल्ला आहे की महिलांनी झोपेला दुर्लक्षित न करता ती आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनवावा. थोडा वेळ स्वतःसाठी काढून नियमित झोप आणि विश्रांतीला प्राधान्य देणे गरजेचे आहे, कारण निरोगी शरीर आणि शांत मन यासाठी योग्य झोपच खरी औषध आहे.