वर्धा,
stealing-cash-and-mobile : गोंडप्लॉट भागातील एका घरात प्रवेश करून मोबाइल व रोख लंपास करणार्या चोरट्यास अटक करण्यात शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. चोरट्याकडून पोलिसांनी रोख व चोरीचा मोबाइल जप्त केला. मनोहर बेनपे रा. हेटी (सावध) ता. आर्वी असे चोरट्याचे नाव आहे.
सांधे दुखीवर रामबाण औषध आपण विक्री करीत असल्याचे सांगत गोंडप्लॉट येथील एका महिलेशी अज्ञाताने संवाद साधला. दरम्यान चोरट्याने महिलेच्या घरातून १० हजारांची रोकड व मोबाइल चोरून नेला. ही बाब लक्षात आल्यावर शहर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली. तक्रारीवरून शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने चोरटा कोण, याची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तपासाचे चक्र फिरवले. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मनोहर बेनपे याला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी ७ हजारांची रोख व चोरीचा मोबाइल असा १४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक शरद गायकवाड, विजय पंचटिके, महेंद्र पाटील, नितीन इटकरे, गजेंद्र धर्मे, रंजित भुरसे यांनी केली.