दिल्ली विमानतळावर तांत्रिक बिघाड! १०० हून अधिक उड्डाणे रखडली

    दिनांक :07-Nov-2025
Total Views |
नवी दिल्ली,
Technical glitch at Delhi airport दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (आयजीआय) उड्डाणांच्या कामकाजात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) प्रणालीमध्ये आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे विमान उड्डाणे वेळेवर सुरू होऊ शकत नाहीत. या बिघाडाचा थेट परिणाम देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही उड्डाणांवर झाला असून, सुमारे १०० हून अधिक विमानांची वेळापत्रकं विस्कळीत झाली आहेत. प्रवाशांना विमानतळावर तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे.
 
dilhi
 
विमानतळ प्रशासनाने जाहीर केले की, एटीसी सिस्टममधील तांत्रिक अडचणीमुळे अनेक विमानांची उड्डाणे उशिरा सुरू होत आहेत. संबंधित समस्या सॉफ्टवेअरशी निगडित असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तांत्रिक तज्ज्ञांची पथके सध्या या त्रुटीचं निराकरण करण्यासाठी रात्री-दिवस प्रयत्न करत आहेत. “डायल” आणि विमानतळ टीम मिळून सर्व भागधारकांसह ही समस्या शक्य तितक्या लवकर सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या अडथळ्यामुळे स्पाइसजेटसह अनेक विमान कंपन्यांच्या उड्डाणांवर परिणाम झाला आहे. प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून, त्याबाबत विमानतळ प्रशासनाने खेद व्यक्त केला आहे. त्यांनी सर्व प्रवाशांना त्यांच्या उड्डाणांबाबत अद्ययावत माहितीसाठी संबंधित विमान कंपनीच्या अधिकृत माध्यमांशी संपर्कात राहण्याचा सल्ला दिला आहे.
 
दरम्यान, तांत्रिक बिघाडाचे मूळ कारण दिल्ली विमानतळावरील ऑटोमॅटिक मेसेज स्विचिंग सिस्टम (AMSS) मध्ये असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही प्रणाली हवाई वाहतूक नियंत्रणाशी संबंधित महत्त्वाची माहिती पुरवते. सध्या उड्डाण योजना नियंत्रकांकडून मॅन्युअली प्रक्रिया केल्या जात आहेत, ज्यामुळे उशीर होत आहे. तांत्रिक पथके प्रणाली पुन्हा सुरळीत करण्यासाठी कार्यरत आहेत.