बोस्टन,
Government shutdown hits America : अमेरिकेत सुरू असलेल्या सरकारी शटडाऊनच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या आपत्कालीन याचिकेला मंजुरी दिली आहे. या आदेशामुळे ‘पूरक पोषण सहाय्य कार्यक्रम’ (SNAP) अंतर्गत नोव्हेंबर महिन्याचे पूर्ण अन्नसहाय्य वितरण तात्पुरते थांबविण्यात आले आहे. काही राज्यांमध्ये लाभार्थ्यांना हे पैसे आधीच मिळाले असले तरी, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे इतर राज्यांतील वितरण थांबण्याची शक्यता आहे.
याआधी रोड आयलंडमधील फेडरल न्यायाधीशांनी प्रशासनाला नोव्हेंबर महिन्याचे संपूर्ण SNAP लाभ वितरित करण्याचे आदेश दिले होते. मात्र, निधीअभावी प्रशासनाने या आदेशावर स्थगिती मागितली. अखेरीस न्यायमूर्ती केटनजी ब्राउन जॅक्सन यांनी उशिरा रात्री आदेश जारी करत हा निर्णय अपील न्यायालयाच्या सुनावणीपर्यंत थांबवला.
SNAP हा अमेरिकेतील सर्वात मोठा अन्नसहाय्य कार्यक्रम असून दर आठपैकी एक अमेरिकन नागरिक त्यावर अवलंबून आहे. या योजनेत कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना दरमहा अन्नासाठी मदत दिली जाते. काही राज्यांनी आदेशानंतर घाईघाईत निधी वितरित केला, तर काही राज्ये अद्याप केंद्रीय मार्गदर्शनाची प्रतीक्षा करत आहेत.
ट्रम्प प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, काही राज्यांनी उपलब्ध मर्यादित निधीतून मोठ्या प्रमाणात रक्कम घेतल्याने इतर राज्यांच्या वाट्याला येणारा निधी कमी झाला आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने हस्तक्षेप करत SNAP निधीवरील पूर्ण देयके तात्पुरते स्थगित केली आहेत.
सध्याच्या परिस्थितीत लाखो अमेरिकन कुटुंबांना अन्नसहाय्य मिळण्यात विलंब होत आहे आणि कमी उत्पन्न असलेले नागरिक अन्नाच्या तुटवड्याचा सामना करत आहेत.