बामाको (माली),
Indians kidnapped by Mali : पश्चिम आफ्रिकेतील माली देशात अल-कायदा आणि आयसिसशी संबंधित दहशतवाद्यांनी पाच भारतीयांचे अपहरण केले आहे. या घटनेची पुष्टी संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींनी केली असून, अपहृत भारतीय एका वीजप्रकल्पाशी निगडित कामावर होते. गुरुवारी मालीच्या पश्चिम भागातील कोबरी परिसरात बंदूकधाऱ्यांनी त्यांना पळवून नेले आणि अज्ञात ठिकाणी हलवले.
एएफपी वृत्तसंस्थेनुसार, हे सर्व भारतीय एका खाजगी कंपनीचे कर्मचारी असून, देशात उग्रवाद आणि हिंसाचार वाढल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. कंपनीने उर्वरित भारतीय कर्मचाऱ्यांना राजधानी बामाको येथे सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. अद्याप कोणत्याही संघटनेने या अपहरणाची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
माली सध्या लष्करी सत्तेखाली असून, अल-कायदा आणि इस्लामिक स्टेटशी संबंधित गट देशात वाढत्या अस्थिरतेस कारणीभूत ठरत आहेत. या प्रदेशात परदेशी नागरिकांना लक्ष्य करण्याच्या घटना सामान्य झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी जिहादी गट जेएनआयएमने दोन यूएई नागरिक आणि एका इराणी नागरिकाचे अपहरण केले होते. त्यांच्या सुटकेसाठी तब्बल ५० दशलक्ष डॉलर्सची खंडणी दिली गेल्याचे सांगितले जाते. भारतीय दूतावासाला या घटनेची माहिती देण्यात आली असून, पाचही भारतीयांची सुरक्षित सुटका करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.