AI129 फ्लाइट लेट! प्रवाशांना उतरवून पुन्हा तपासणी का?

    दिनांक :08-Nov-2025
Total Views |
मुंबई,
Air India-AI129 flight : मुंबईहून लंडन हीथ्रो विमानतळावर जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI129 या विमानाच्या उड्डाणात मोठा विलंब झाला आहे. आज सकाळी साडेसहाला उड्डाण होणारी ही फ्लाइट दुपारपर्यंत मुंबई विमानतळावरच थांबलेली होती. प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला फक्त अर्धा तास उशीर होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, प्रवाशांना फ्लाइटमध्ये बसवल्यानंतर जवळपास दीड तासानंतर विमानातील तांत्रिक बिघाडामुळे त्यांना उतरविण्यात आले.
 

AIR INDIA
 
 
 
सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी सर्व प्रवाशांना विमानातून खाली उतरवून त्यांच्या हँड बॅगची पुन्हा तपासणी करण्यात आली. त्यानंतर प्रवाशांना सांगण्यात आले की, आता विमान दुपारी बारा वाजता उड्डाण घेईल. पण पुढे हा वेळ वाढवून दुपारी एक वाजेपर्यंत ढकलण्यात आला.
एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की ही समस्या AMSS प्रणालीशी संबंधित नसून विमानातील तांत्रिक अडचणीमुळे उड्डाण लांबले आहे. कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, क्रू मेंबर्सच्या फ्लाइट ड्यूटी टाइम लिमिटेशन (FDTL) प्रोटोकॉलमुळे सध्या उड्डाण परवानगी मिळू शकत नाही.
या अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल एअर इंडियाने दिलगिरी व्यक्त केली असून, मुंबईतील ग्राउंड टीम प्रवाशांना अन्नपदार्थ आणि आवश्यक मदत पुरवत आहे. प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन त्यांना शक्य तितक्या लवकर गंतव्यस्थानी पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही प्रवक्त्यांनी सांगितले.