पांगरी महादेव गावाची प्रशासनाची पाहणी

ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन

    दिनांक :09-Nov-2025
Total Views |
मंगरुळनाथ, 
pangri-mahadev-village : तालुक्यातील पांगरी महादेव या गावाने गेल्या तब्बल २३ वर्षांपासून स्वतंत्र ग्रामपंचायत आणि विविध विकासकामांच्या मागण्यांसाठी सातत्याने संघर्ष केला. मात्र, शासनाचे पांगरी गावाकडे लक्ष नव्हते. तेथील रहिवाशांचा संघर्ष पाहून अखेर प्रशासनाने गावात प्रत्यक्ष जाऊन ग्रामस्थांच्या व्यथा ऐकल्या आणि न्याय देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे गावात समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
 
j
 
सन २००१ मध्ये अकोला जिल्ह्यातून वाशीम जिल्ह्यात समाविष्ट झाल्यानंतरही पांगरी महादेव गावातील अनेक शासकीय सेवा अजूनही बार्शीटाकळी तालुयातच कार्यरत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना रोजच्या व्यवहारात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. याबाबत दीर्घकाळ तक्रारी असूनही उपाय न झाल्याने ग्रामस्थांचा संयम सुटला होता. याच पार्श्वभूमीवर गावकरी आणि सामाजिक कार्यकर्ते किशोर देशमुख यांनी खासदार संजय देशमुख यांच्या माध्यमातून ३१ ऑटोबर रोजी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदन दिले. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी तात्काळ कारवाई करत उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बोंद्रे यांना सर्व विभाग प्रमुखांसह पांगरी महादेव येथे बैठकीचे आदेश दिले.
 
 
या बैठकीत उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बोंद्रे, गटविकास अधिकारी डॉ. बोरखडे, प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेचे उपअभियंता झळके,वैद्यकीय अधिकारी डॉ. पुजा गजरे, पशुधन विकास अधिकारी मेंढे, जलसंधारण अधिकारी तायडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी उपविभागीय अधिकारी यांच्या सोबत सर्व अधिकार्‍यांनी गावची पाहणी केली आणि गावात स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करणे,घरकुल योजनेसाठी नमुना आठ तयार करून सर्व पात्र ग्रामस्थांना देणे, सिंचन व पिण्याच्या पाण्याच्या योजनांमधील त्रुटी दूर करणे, पांदण रस्ते, शेत रस्ते आणि वन्य प्राण्यांच्या त्रासावर उपाय, गावातील आरोग्य सेवा आणि तपासणी मोहीम सुरू करणे, राशन कार्ड, पेन्शन योजना, जात प्रमाणपत्रे यासारखी कागदपत्रे गावातच उपलब्ध करणे, गावाला एखाद्या बँकेच्या दत्तकत्वाखाली आणणे जेणेकरून शेतकर्‍यांना कर्ज मिळू शकेल, विद्यार्थ्यांसाठी परिवहन मंडळाची बस सेवा सुरू करणे,आदी विषयावर चर्चा करण्यात आली.
 
 
याप्रसंगी गावचे पोलिस पाटील भाऊराव राठोड, ग्रामसभा अध्यक्ष विष्णू मंजुळकर, प्रल्हाद राठोड, देवचंद फुलार, सुदर्शन मंजुळकर, सुखदेव जाधव, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.