रसिकांच्या भरगच्च उपस्थितीत रंगला मी मुक्त मोरणी बाई नाटकाचा प्रयोग

    दिनांक :09-Nov-2025
Total Views |
बुलढाणा, 
buldhana-news : महिलांच्या दोन पिढ्यांमधील विचारांचा संघर्ष हा संवादाच्या पातळीवर आल्यास रचनात्मक घडू शकते व त्यातून स्त्री जाणिवेचा उत्तम आविष्कार समोर येऊ शकतो, असा आशय असणार्‍या शशिकांत इंगळे लिखित व गणेश बंगाळे दिग्दर्शित मी मुक्त मोरणी बाई या एकांकिकेच्या प्रयोगाला बुलढाणेकर नाट्य रसिकांनी भरभरून दाद दिली.
 
 
k
 
येथील कारंजा चौकस्थित गोवर्धन सभागृहात ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी हा प्रयोग पार पडला. अक्षरदेह नाट्यकला संस्थेतर्फे या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. आ. संजय गायकवाड यांच्याहस्ते नटराज पूजन व दीपप्रज्वलन करुन प्रयोगाला सुरुवात करण्यात आली. यावेळी सुप्रसिद्ध साहित्यिक बारोमासकार प्रा.डॉ. सदानंद देशमुख, बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक रवी राठोड, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजितसिंग राजपूत, पत्रकार राजेंद्र काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. अक्षरदेहचे पदाधिकारी शशिकांत इंगळे, संतोष पाटील, डॉ. दुर्गासिंग जाधव, गणेश राणे, शैलेश वारे, विलास मानवतकर यांनी उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
 
 
नाटकाच्या सुरुवातीला रंगमंच उजळताच एक तरुण मुलगी व दोन महिलांमधील खोचक संवादातून रंगलेले नाट्य पुढे वादात आणि त्यानंतर मात्र संवादात परावर्तीत होते. मनस्वी संगीत, समर्पक प्रकाशयोजना व साजेशे नेपथ्य तसेच उत्तम अभिनयाने सादर झालेल्या या कलाकृतीने रसिकांची मने जिंकली. या नाटकामध्ये सांची इंगळे हीने पिकाशू या पात्राची मुख्य भूमिका साकारली तर आशा मानवतकर, रुचिरा पाटील, प्राजक्ता कुलकर्णी, अश्विनी लोहगावकर, सुरेखा इंगळे, सविता सोनोने, पौर्णिमा साबळे व भारती बर्‍हाटे यांनीही आपापल्या भूमिकेला न्याय दिला. लक्ष्मीकांत गोंदकर यांनी प्रकाशयोजना केली तर गणेश राणे यांनी संगीत दिले.
 
 
पवन बाबरेकर व तुषार काचकुरे यांनी नेपथ्य केले. रंगभूषा अक्षरा परमार तर वेशभूषा सुषमा राणे यांनी केली. संतोष पाटील व विलास मानवतकर यांनी संघ व्यवस्थापन केले. रंगमंच सहाय्य अ‍ॅड. मृणाल सावळे, शैलेश वारे, ऋषीश्वर चोपडे, सृजन इंगळे यांनी केले. अण्णासाहेब जाधव, डॉ. दुर्गासिंग जाधव, विजय सोनोने, पराग काचकुरे, मयुर परमार यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. उद्योजक हरीश खंडेलवाल यांनी एकांकिका बघून कलावंतांचा पाच हजार रुपयांचे बक्षिस देऊन गौरव केला. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ‍ॅड. मृणाल सावळे यांनी केले तर संतोष पाटील यांनी आभार मानले. नाट्य प्रयोगाला शहरातील सर्व क्षेत्रातील नागरीकांनी गर्दी केली होती. रसिकांच्या भरगच्च प्रतिसादात हा प्रयोग पार पडला.