निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज

५० अधिकारी व कर्मचार्‍यांची नेमणूक

    दिनांक :09-Nov-2025
Total Views |
कारंजा लाड,
election : नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला १० नोव्हेंबर रोजी अधिकृत सुरुवात होणार असून, निवडणूक प्रक्रिया सुरळीत व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी ५० अधिकारी व कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे.
 
 
 
 
 k
 
 
 
कारंजा उपविभागीय अधिकारी कैलास देवरे हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तर तहसीलदार कुणाल झाल्टे आणि मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार अर्ज स्वीकृतीसाठी तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीत स्वतंत्र कक्षाची व्यवस्था करण्यात आली असून, प्रत्येक उमेदवारास अर्ज सादर करताना आवश्यक कागदपत्रांसह नियमांचे पालन करणे बंधनकारक ठेवण्यात आले आहे. यावेळी अपूर्ण किंवा चुकीचे अर्ज तत्काळ नाकारण्यात येणार असल्याने उमेदवारांकडून काळजीपूर्वक अर्ज सादर केले जाणार आहेत. छाननी, अर्ज मागे घेणे, मतदान आणि मतमोजणी यांसाठी प्रशासनाने विस्तृत नियोजन केले आहे. सुरळीत पारदर्शक निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. दरम्यान, शहरात राजकीय वातावरण रंगतदार झाले. विविध पक्षांचे कार्यकर्ते आपल्या उमेदवारांसोबत उमेदवारी अर्जासाठी कार्यालयात दाखल होतील.
 
 
यंदाच्या नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलासाठी आरक्षीत असल्याने अनेक नवीन तसेच अनुभवी महिला राजकारणात पुढे येत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत महिलांचे प्रतिनिधित्व अधिक प्रभावी दिसून येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कारंजा शहरात आगामी पाच वर्षांसाठी विकासाचा मार्ग कोण ठरवणार, हा लोकशाहीचा पर्व सुरू झाला आहे. मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार प्रामाणिकपणे बजावून सुयोग्य, प्रामाणिक आणि विकासाभिमुख नेतृत्व निवडन्याची अपेक्षा आहे.
 
 
कारंजा नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास १० नोव्हेंबर पासून प्रारंभ होणार असून १७ नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यासाठी निवडणूक विभाग सज्ज झाला असून, उमेदवारांनी आचारसंहितेचे पालन करून बिनचूक उमेदवारी अर्ज दाखल करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.