युती - आघाडीचा निर्णय होईना ! कार्यकर्ते संभ्रमात

सोमवारपासून अर्ज दाखल करण्यास प्रारंभ

    दिनांक :09-Nov-2025
Total Views |
कारंजा लाड, 
karanja-municipal-council-election : कारंजा नगर परिषदेची निवडणूक आता दारात येऊन ठेपली असून, केवळ एक दिवसावर उमेदवारी दाखल करण्याची तारीख आली आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार १० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार असून, १७ नोव्हेंबर ही अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असेल. मात्र, अद्यापही विविध राजकीय पक्षांमधील युती आणि आघाडीचा तिढा कायम असल्याने उमेदवार व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
 
k
 
निवडणुकीच्या रणसंग्रामाची वेळ जसजशी जवळ येते आहे, तसतसे शहरातील राजकीय वातावरणात चैतन्य वाढले आहे. विविध पक्षांकडून संभाव्य उमेदवारांची हालचाल सुरू झाली असून, प्रचाराची प्राथमिक तयारीही दिसू लागली आहे. मात्र, कोणत्या पक्षासोबत कोण युती करणार, कोण आघाडी कायम ठेवणार, यावर अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. भाजप, शिंदे गट आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यात महायुतीच्या जागावाटपावर अद्याप अंतिम तोडगा निघालेला नाही. त्याचवेळी विरोधकांकडून काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यातही आघाडीच्या चर्चेला वेग आला असला तरी अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे उमेदवारांची निवड आणि अर्ज दाखल प्रक्रिया कोणत्या पद्धतीने पार पडेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.यंदाच्या निवडणुकीत ३१ नगरसेवकांच्या निवडीसाठी १५ प्रभागांत मतदान होणार असून, नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला वर्गासाठी आरक्षित आहे. त्यामुळे अनेक महिलांनी राजकारणात उतरायची तयारी सुरू केली असून, शहरातील अनेक राजकीय घराण्यांतील महिला चेहर्‍यांना या निवडणुकीत संधी मिळण्याची शयता आहे.प्रभागनिहाय गणिते, उमेदवारांची संभाव्य यादी, आणि युतीच्या चर्चांमुळे शहरात राजकीय चर्चांना ऊत आला आहे. सर्वच प्रमुख पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठका घेत असून, तिकीट मिळविण्यासाठी अनेक इच्छुकांनी हालचालींना वेग दिला आहे.
 
 
 
निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊनही युती व आघाडीबाबतचा गोंधळ न सुटल्याने उमेदवारांच्या नियोजनावर परिणाम होत आहे. १० नोव्हेंबरपासून अर्ज दाखल प्रक्रिया सुरू होत असताना, प्रमुख पक्षांनी आपले निर्णय लवकरात लवकर जाहीर करणे आवश्यक ठरणार आहे. अन्यथा, अनेक इच्छुक स्वतंत्र उमेदवारीचा पर्याय स्वीकारू शकतात.राजकीय समीकरणे दर तासाला बदलत असताना, कारंजा नगर परिषदेची ही निवडणूक शहराच्या राजकीय भविष्याचा मार्ग ठरवणारी ठरणार आहे. परंतु अद्यापही युती आघाडीचा तिढा न सुटल्याने इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्ते गोंधळात पडले आहे.
 
 
पक्षश्रेष्ठींकडे अनेकांची फिल्डिंग
 
 
सोमवार १० नोव्हेंबर पासून कारंजा नगर परिषद निवडणूक रणसंग्राम सुरू होणार असून, सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे.तर १७ नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. अशातच नगराध्यक्ष व नगरसेवक पदाची निवडणूक लढविणारे इच्छुकांची संख्या अधिक असल्याने अनेकांनी उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग लावल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत युती आघाडी बाबत निर्णय होणे अपेक्षित होते. परंतु उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख एका दिवसावर आली तरी अद्याप निर्णय झाला नाही.त्यामुळे नगरपरिषद निवडणुकीत युती आघाडी होते की नाही अशी शंका इच्छुक उमेदवारांसह मतदारांच्या मनात निर्माण झाली आहे.