महागाव शहरातील मोबाईल ‘नो-नेटवर्क’ झोनमध्ये

बँकेसह सरकारी कामकाज ठप्प : जनजीवन विस्कळीत

    दिनांक :09-Nov-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
महागाव, 
mahagaon-mobile-no-network : महागाव शहर आणि आसपासच्या परिसरातील मोबाईल नेटवर्क आणि कनेक्टिव्हिटीच्या गंभीर समस्येमुळे येथील जनजीवन अक्षरश: विस्कळीत झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मोबाईल सेवा अनियमित असल्याने नागरिक त्रस्त झाले असून, याचा थेट परिणाम बँकेसह विविध शासकीय कार्यालयांमधील दैनंदिन कामकाजावर झाला आहे.
 
 
kl;
 
महागामधील मोबाईल नेटवर्कची स्थिती इतकी वाईट आहे की, अनेकदा नेटवर्क पूर्णपणे गायब होते किंवा अत्यंत कमी असते. यामुळे बँकेतील ऑनलाइन व्यवहार, पैसे काढणे, आरटीजीएस, एनईएफटी आणि इतर डिजिटल सेवा पूर्णपणे ठप्प होत आहेत. ग्राहकांना तासन तास रांगेत उभे राहूनही आपले काम पूर्ण करता येत नाही.
 
 
 
तहसील कार्यालय, कृषी विभाग, भूमी अभिलेख आणि इतर सरकारी कार्यालयांमधील ‘ऑनलाईन’ आधारित कामे खोळंबली आहेत. अनेक शासकीय योजना आणि डेटा अपलोडिंगची कामे वेळेवर होत नसल्यामुळे सरकारी यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उभे राहिले आहे.
 
 
नेटवर्क नसल्यामुळे दुकानांमध्ये, पेट्रोल पंपांवर आणि इतर ठिकाणी होणारे युपीआय आणि क्यूआर कोड आधारित पेमेंट वारंवार अयशस्वी होत असल्याने व्यापारी आणि ग्राहक दोघांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्याच प्रमाणे ऑनलाइन शिक्षण, विद्यार्थ्यांचे अर्ज भरणे, आणि आरोग्य विभागातील डेटा एंट्रीची कामेही खोळंबत आहेत.
 
 
मोबाईल कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे नागरिकांचे खासगी तसेच व्यावसायिक संवाद पूर्णपणे थांबले आहेत. तातडीच्या वेळी संपर्क साधता येत नसल्याने, आरोग्य आणि इतर आपत्कालीन सेवांवरही परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
आजकाल सर्व कामे मोबाईल आणि इंटरनेटवर अवलंबून आहेत. पण महागावमध्ये साध्या फोनवर बोलणेही कठीण झाले आहे. बँकेत गेलो तर ‘नेटवर्क नाही’ हेच उत्तर मिळते. यामुळे आमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात आहे.
- सतीश जाधव
ऑनलाइन सेंटर चालक महागाव
 
महागावमधील ही गंभीर समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने आणि संबंधित दूरसंचार कंपन्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही यावर कायमस्वरूपी उपाययोजना होताना दिसत नाही. तातडीने टॉवरची क्षमता वाढवणे, नवीन टॉवर उभे करणे आणि नेटवर्कमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे, जेणेकरून महागावचे जनजीवन पुन्हा सुरळीत होईल आणि नागरिकांना होणारा त्रास थांबेल.
- अमोल शिंदे
किराणा व्यवसायी, महागाव