मोतसावंगा, रामगाव येथील शेतकर्‍यांचा रब्बी हंगाम धोक्यात

वीज पुरुवठा बंद, शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात

    दिनांक :09-Nov-2025
Total Views |
मंगरुळनाथ, 
rabi-season : यंदा दरवर्षीपेक्षा जास्त पाऊस आल्याने मोतसावंगा, रामगांव परिसरातील धरण पाण्याने भरपूर भरलेले असून ही येथील शेतकर्‍यांना वीज बंद मुळे यावर्षी रब्बी हंगाम घेणे कठीण झाले आहे. त्यामुळे धरण उशाशी कोरड घशाशी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगाम अति पावसाने बुडालेला असून रब्बी हंगामावर शेतकर्‍यांचे सर्वस्व अवलंबून आहे बाब लक्षात घेऊन मोतसवंगा रामगाव येथील शेतकर्‍यांना तात्काळ वीज उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ७ नोव्हेंबर रोजी वीज वितरण कंपनीकडे शेतकर्‍यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
 
 
 jk
 
निवेदनात नमूद आहे की वीज वितरण कंपनीने चालु वर्षी नविन लाईनमनची नियुक्ती केलेली असून,त्यांचे नियुक्तीपासुन आमच्या गावांचा त्रास खुप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. दिवाळीच्या सणात सुध्दा उपरोक्त दोन्ही गांवे अंधारात होते. याबाबत लाईनमनकडे विचारणा केली असता त्यांनी उडवा उडविची उत्तरे देउन तुम्हाला काय करायचे ते करा जास्त बोलसाल तर तुमच्यावर एफआयआर दाखल करील अशा धमया दिल्या आहेत. त्यानंतर या गावातील शेतकर्‍यांनी महावितरण कंपनीच्या कार्यालयात चकरा मारल्या तरीही शेतकर्‍यांच्या समस्या निकाली लागल्या नाहीत. पावसाळयात अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झालेले असून, सोयाबिन एकरी पाच ते सहा पोते उत्पन्न होण्याऐवजी ते सोयाबीन दोन ते तीन पोते एवढेच हाती आली आहे. रब्बी हंगामात काहीतरी नुकसान भरून निघेल या आशेने शेतकर्‍यांनी पेरणीची तयारी केली आहे. परंतु, लाईनमनच्या हेकेखोरीमुळे शेतकरी कात्रीत सापडला आहे. शेतकर्‍यांनी कांदा व मका यासारख्या बियाणे कंपनी सोबत करार केलेला होता. परंतु वेळेवर पेरण्या न झाल्याने कंपन्यांनी त्यांचे बियाने परत नेले आहे.
 
 
लाईनमन यांची तात्काळ बदली करुन नविन लाईनमन देण्यात यावा व तात्काळ कास्तकारांना रब्बी पेरणी करिता लाईन लाईन सुरु करुन देण्यात यावी अन्यथा, १० नोव्हेंबर रोजी कास्तकार आपल्या कार्यालयात सामूहिक आत्मदहन करण्यात येईल असे निवेदनात नमूद केले आहे. निवेदनावर विशाल निचळ, सुभाष लोखंडे, सुभाष नांदे, देविदास निचळ, नारायण हजारे, गजानन गिरे, बळीराम डाखोरे, तानाजी निचळ, विलास कोकरे, भारत निचळ, शिवदास नांदे, गणेश भोडणे, गोविंदा जामकर, सुधीर उगले यासह शेकडो शेतकर्‍यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.