राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे: जिल्हाधिकारी कुंभेजकर

राजकीय पक्षांची आढावा बैठक

    दिनांक :09-Nov-2025
Total Views |
वाशीम, 
yogesh-kumbhejkar : निवडणुका ह्या लोकशाहीचा प्रमुख केंद्रबिंदू असून नि:पक्ष आणि मुक्त वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. त्यासाठी सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.
 
 
jkj
 
जिल्हाधिकारी कार्यालयात राजे वाकाटक सभागृहात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. बैठकीला अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, नगरपालिका प्रशासन सहआयुक्त बी. डी. बिक्कड, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कोवे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी डॉ. योगेश क्षिरसागर , तहसीलदार निलेश पळसकर आदी उपस्थित होते.
 
 
राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर २०२५ रोजी ४ नगरपरिषद व १ नगरपंचायतीचा सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक आहे. आचारसंहितेचे कुठेही त्याचे उल्लंघन होणार नाही, याबाबत सर्वांनी काळजी घ्यावी.
 
 
पुढे जिल्हाधिकारी कुंभेजकर म्हणाले, राजकीय पक्षांना विविध परवानग्यांसाठी तालुकास्तरावर ‘एक खिडकी’ सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यावेळी खर्च पथकाचे नोडल अधिकारी डॉ. क्षिरसागर यांनी उमेदवार आणि राजकीय पक्षांनी करावयाच्या खर्चाबाबत, देवकर यांनी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याबाबत, नगरपालिका प्रशासन सहआयुक्त यांनी परवानग्या बाबत, आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी कोवे यांनी आचारसंहिता पालनाबाबत मार्गदर्शन केले.
 
 
यावेळी तेजराव वानखेडे, सुरेश मापारी, गजानन गोटे, रमेश गोटे, अ‍ॅड.संघनायक मोरे, दत्तराव गोटे, भागवत सावके यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी जिल्हा प्रशासनाला आवश्यक सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. बैठकीच्या शेवटी जिल्हाधिकारी यांनी सर्व पक्षांनी परस्पर सन्मान आणि संयम राखून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने केले. उपस्थितांचे आभार निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी मानले.