‘जय श्रीराम’च्या घोषात दुमदुमला ‘जागर भक्तीचा’

- रामरक्षा व मारुती स्तोत्र पठणाने वातावरण झाले मंगलमय

    दिनांक :09-Nov-2025
Total Views |
नागपूर, 
nagpur-news : ‘जय श्रीराम’ आणि ‘जय हनुमान’ च्या गजराने ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्रांगण भक्तीमय झाले. खासदार सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत आयोजित ‘जागर भक्तीचा’ कार्यक्रमात रविवार दिनांक ९ नोव्हेंबर रोजी १३ वेळा रामरक्षा स्तोत्र आणि मारुती स्तोत्र पठण अत्यंत श्रद्धाभावाने संपन्न झाले. या वेळी शेकडो भक्त, महिला, युवक आणि लहान मुलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
 
 
kj
 
यावेळी सामाजिक कार्यकर्त्या आणि संस्कार भारतीच्या अध्यक्षा कांचन गडकरी, भगवताचार्य स्वामी सूरीथानंदजी महाराज, स्वामी सूर्यानंद महाराज, विश्व हिंदू परिषदेचे नीलकंठ गुप्ता, प्रतिभा दटके, आभा कोल्हे, रवी वाघमारे, साहित्यिक रश्मी वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी सहजयोग संस्थेतर्फे ध्यान व योगाभ्यास सत्र पार पडले. त्यानंतर कांचन गडकरी यांनी ‘नामस्मरण दिंडी’चे पूजन केले. चंदन नगरातून निघालेल्या या दिंडीचे क्रीडा चौकात स्वागत झाले. तुळशीची रोपटी हातात घेतलेल्या बालिकांनी ‘श्रीराम जय राम जय जय राम’च्या जयघोषात भक्तिभावाचे वातावरण निर्माण केले. शेवटी रामाची आरती व अल्पोपहार वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.
 
“देश-धर्मासाठी सदैव तत्पर रहा”
 
- भगवताचार्य स्वामी सूरीथानंदजी महाराज
 
स्वामी सूरीथानंदजी महाराज यांनी सांगितले की, “संस्कारपूर्ण पिढी हीच राष्ट्राची खरी ताकद आहे. अशा उपक्रमांमुळे मन स्थिर राहते, अध्यात्मिकतेतून मनोविकास साधता येतो आणि देश-धर्मासाठी तत्पर राहण्याची प्रेरणा मिळते.”