उद्यापासून न.प. अध्यक्ष व सदस्यपदासाठी अर्ज स्वीकृती

कागदपत्रे गोळा करण्यासाठी इच्छुकांची धावपळ

    दिनांक :09-Nov-2025
Total Views |
वाशीम, 
municipal-council-election : वाशीम जिल्ह्यातील चार नगरपरिषदा व एका नगरपंचायतसाठी निवडणूक होणार असून, त्यासाठी १२४ सदस्य व पाच अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज १० नोव्हेंबर पासून स्वीकारले जाणार आहेत. जिल्ह्यातील पाचही ठिकाणी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी प्रशासनाच्या वतीने आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली आहे. १७ नोव्हेंबर पर्यंत इच्छुक उमेदवारांना आपले अर्ज दाखल करता येणार आहेत.
 

j  
 
उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारांना अनामत जमा करावी लागते. नगर परिषद क्षेत्रासाठी अध्यक्ष व सदस्य पदांच्या उमेदवारांना दोन हजार रुपये तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या जागांसाठी एक हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. तर नगरपंचायत साठी अध्यक्ष व सदस्य पदाकरिता सर्वसाधारण उमेदवाराला एक हजार रुपये तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती जागांसाठी पाचशे रुपये एवढी अनामत रक्कम भरावी लागणार आहे.
 
 
वाशीम नगर परिषद मध्ये एकूण ३२ सदस्य तर एक अध्यक्ष निवडून द्यावयाचा आहे, त्याकरिता १० नोव्हेंबर पासून नगरपरिषद कार्यालयात उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. रिसोड नगर परिषद मध्ये एकूण २३ सदस्य व एक अध्यक्ष, कारंजा नगर परिषद मध्ये ३१ सदस्य व एक अध्यक्ष, मंगरूळनाथ नगर परिषद मध्ये २१ सदस्य व एक अध्यक्ष तर मालेगाव नगरपंचायत मध्ये १७ सदस्य व एक अध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. याकरिता संबंधित तहसील किंवा नगरपरिषद कार्यालयात अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
 
 
नगरपरिषद अध्यक्ष हा थेट जनतेतून निवडल्या जाणार असल्यामुळे नगरपरिषद अध्यक्ष पदाच्च्या निवडणुकीमध्ये चांगलीच चुरस निर्माण होणार आहे. सदस्य पदांसाठीही अनेकांनी जोरदार तयारी केली असून बरेच जण पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना लागणार्‍या आवश्यक कागदपत्रांसाठी संबंधित नगरपरिषद कार्यालयात वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित कागदपत्र मिळविण्यासाठी इच्छुकांची नगरपरिषद कार्यालयात धावपळ सुरू आहे.