शेतकर्‍यांचा माल प्रतवारीनुसार योग्य भावाने खरेदी करा: आ. सई डहाके

बैठकीत व्यापार्‍यांची कानउघडणी

    दिनांक :09-Nov-2025
Total Views |
कारंजा लाड, 
sai-dahake : बाजार समिती ही शेतकर्‍यांची संस्था आहे. येथे येणारा प्रत्येक शेतकरी आपल्या मेहनतीचा माल विकण्यासाठी येतो. त्याला त्रास देणे, कमी दर सांगणे किंवा बोली प्रक्रियेत गैरव्यवहार करणे हे अजिबात सहन केले जाणार नाही. प्रत्येक व्यवहार प्रतवारीनुसार, पारदर्शक पद्धतीने पार पडला पाहिजे. अन्यथा कारवाई केली जाईल असा गर्भित इशारा आ. सई डहाके यांनी यावेळी व्यापार्‍यांना दिला.
 
 
 jk
 
शेतकरी हा अन्नदाता असून, त्याच्या घामाच्या कष्टाला योग्य मोबदला मिळणे हे अनिवार्य आहे. परंतु कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीत घडलेल्या अप्रिय घटनेमुळे शेतकर्‍यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर ८ नोव्हेंबर रोजी बाजार समिती सभागृहात अडते आणि व्यापारी यांची तातडीची बैठक घेऊन सभापती तथा आमदार सई डहाके यांनी शेतकर्‍यांना त्रास होणार नाही याची पूर्ण जबाबदारी तुमची आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना सन्मानाची वागणूक देऊन शेतमाल योग्य भावाने खरेदी करण्यात यावा असे निर्देश दिले.
 
 
तीन दिवसापूर्वी बाजार समिती परिसरात एका व्यापार्‍याने शेतकर्‍याला मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेचा सर्वत्र निषेध होत असताना सर्वधर्म आपत्कालीन सेवा संस्थेचे अध्यक्ष श्याम सवाई यांनी बाजार समिती प्रशासनास निवेदन देऊन जबाबदार व्यापार्‍यावर कारवाईची मागणी केली होती. या घटनेमुळे व्यापारी वर्गावरील अविश्वास वाढू लागला होता. परिणामी, सभापतींनी तातडीने बैठक बोलावून सर्व संबंधितांना एकाच व्यासपीठावर आणले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार सई डहाके होत्या.
 
 
आ. डहाके पुढे म्हणाल्या की, सध्या सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. त्यामुळे व्यापार्‍यांनी शेतकर्‍यांना दीर्घ रांगेत उभे ठेवून वेळ वाया घालवू नये. वजन, मोजणी आणि दर ठरवताना नियमांचे काटेकोर पालन करावे. या बैठकीत व्यापार्‍यांनीही शेतकर्‍यांना त्रास होणार नाही याची ग्वाही दिली. बाजार समिती प्रशासनाने परिसरात शिस्त राखण्यासाठी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्याचे ठरवले आहे. तसेच प्रत्येक व्यवहारावर देखरेख ठेवण्यासाठी समिती अधिकारी जबाबदार असतील, असे स्पष्ट करण्यात आले.
 
 
सर्वधर्म आपत्कालीन संस्थेचे अध्यक्ष श्याम सवाई यांनी शेतकरी हा फक्त व्यापार्‍यांसाठी ग्राहक नाही, तर समाजाचा आधारस्तंभ आहे. त्याच्याशी होणारा अन्याय हा संपूर्ण समाजावरील कलंक आहे. असे म्हणत सभापतींनी घेतलेल्या तत्पर निर्णयाचे स्वागत केले.
लोकप्रतिनिधी म्हणून आमदार सई डहाके यांनी घेतलेली भूमिका शेतकर्‍यांच्या हितासाठी सकारात्मक आणि प्रभावी ठरली आहे. परंतु, ही फक्त एका बैठकीची मर्यादा न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणीत दिसली पाहिजे, अशी शेतकर्‍यांची अपेक्षा आहे. लोकशाही आणि बाजार दोन्ही तेव्हाच मजबूत होतात, जेव्हा कष्टकरी शेतकर्‍याचा सन्मान राखला जातो. त्यामुळे ही बैठक त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल म्हणता येईल.