निवडणूक प्रक्रियेत मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांची महत्त्वाची भूमिका: जिल्हाधिकारी कुंभेजकर

प्रशिक्षणातून निवडणूक प्रक्रियेत अचुकता व पारदर्शकतेवर भर

    दिनांक :09-Nov-2025
Total Views |
वाशीम, 
yogesh-kumbhejkar : निवडणूक प्रक्रियेत मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मतदारांना नि:पक्ष, सुरक्षित आणि पारदर्शक मतदानाचा अनुभव देण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले.
 
 
kl
 
आगामी निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत व निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्वांगीण तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व कर्मचारी यांचे सर्वंकष प्रशिक्षण ८ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील,निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हाधिकारी विरेंद्र जाधव, नगरपालिका प्रशासन सहआयुक्त बी.बी. बिक्कड, सहाय्यक सूचना विज्ञान अधिकारी नेमसिंग तोमर उपस्थित होते. या प्रशिक्षणादरम्यान निवडणूक कार्यातील प्रत्येक टप्प्याचे सविस्तर सादरीकरण अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील यांनी केले.
 
 
प्रशिक्षणादरम्यान महाराष्ट्र निवडणूक अधिनियम आणि निवडणूक आयोगाच्या तरतुदी, मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांच्या जबाबदार्‍या, तसेच मतदान केंद्रावर अनुसरण्याची प्रक्रिया टप्प्यानुसार स्पष्ट करण्यात आली.मतदान केंद्रांवरील पूर्वतयारी, मतदान केंद्राची रचना , अनुषंगिक जोडपत्र,मतदान प्रतिनिधींची आसनव्यवस्था, व्हीझीट शीट, तसेच बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट या मतदान यंत्रांची ओळख याबाबत माहिती देण्यात आली.
 
 
जिल्हाधिकारी कुंभेजकर म्हणाले, मतदार यादीतील संभाव्य दुबार नावे शोधण्यासाठी विशेष सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. या सॉफ्टवेअरमध्ये दुबार नावे ‘डबल स्टार’ चिन्हाने दर्शविली जातील. अशा मतदारांना संपर्क साधून, तो मतदार प्रत्यक्ष कुठे मतदान करणार आहे याची खातरजमा करावी आणि त्याचे हमीपत्र घेऊन खात्री करावी. ते पुढे म्हणाले की, मतदान केंद्र परिसरात कोणत्याही राजकीय पक्षाचे बॅनर, पोस्टर किंवा छायाचित्रे असू नयेत. मतदान केंद्राध्यक्षांनी मतदान अधिकारांना एन्ड बटन वापराबाबतची संपूर्ण समज देणे आवश्यक आहे. सर्व झोनल अधिकारी व कर्मचारी यांनी निवडणूक दिवशी सजग राहावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. तसेच प्रशिक्षणाद्वारे मिळालेल्या सूचनांचे काटेकोर पालन केल्यास निवडणूक प्रक्रिया अधिक सुलभ व विश्वासार्ह होईल, असेही त्यांनी नमूद केले.
 
 
या प्रशिक्षणाचा उद्देश अधिकारी आणि कर्मचारी यांना निवडणूक प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्याची अचूक माहिती देऊन मतदान प्रक्रिया पारदर्शक, अचूक आणि निर्विघ्नपणे पार पाडणे हा होता. नोडल अधिकारी,झोनल अधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तसेच सर्व मुख्याधिकारी यांच्यासह निवडणूकीशी संबंधित यंत्रणा दुरदृष्य प्रणालीव्दारे प्रशिक्षण सत्राला जोडले गेले.