स्ट्रॉग रुमच्या हालचाली डिस्प्लेवर तपासणीकरिता नऊ अधिकार्‍यांची नियुक्ती

सीसी कॅमेर्‍याचे चित्रण पाहण्यासाठी उमेदवारांना बैठक व्यवस्था

    दिनांक :10-Dec-2025
Total Views |
बुलढाणा,
Buldhana municipal election, नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर मतदान मशीन नगर परिषदेमध्येच स्ट्रॉग रुम तयार करून ठेवण्यात आल्या आहेत. त्या भोवती तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतदान मशीन पूर्णतः सुरक्षित असल्याचा पुरावा दर्शविण्यासाठी स्ट्रॉग रुममधील हाय सिक्युरिटीच्या सर्व हालचाली उमेदवारांना पाहण्याकरिता बाहेर डिस्प्ले लावण्यात आला आहे. त्याचप्रमाणे तपासणी करण्यासाठी नऊ अधिकार्‍यांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. बुलढाण्याचे निवडणूक निर्णय अधिकारी शरद पाटील हेदेखील बारकाईने लक्ष ठेऊन आहेत.
 

Navegaon-Nagzira Tiger Project 
बुलढाणा नगर परिषदेसाठी नगराध्यक्षपदाचे ७ आणि नगरसेवकपदाचे १२४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. काही मतदान केंद्रांवरील बोगस मतदानाचा प्रयत्न आणि तणावाच्या घटनांनी मतदानाला गालबोट लागले. त्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. सायंकाळी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतदान यंत्रे पोलीस बंदोबस्तात नगर परिषदेतील स्ट्रॉग रुममध्ये नेण्यात आली.स्ट्रॉग रुमभोवती मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच सर्व हालचाली टिपण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. कुणाला कुठलीही शंका येऊ नये यासाठी सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या माध्यमातून चित्रण होत असलेला एक डीस्प्लेसुद्धा पक्षीय व अपक्ष उमेदवारांना बाहेर उपलब्ध करून देण्यात आला आहे. येथील हाय सिक्युरिटीमध्ये मतदान मशीन सुरक्षित असल्याचे उमेदवारांना दाखविण्यासाठी बैठक व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. पोलीस बंदोबस्त तर आहेच पण निवडणूक विभागाच्या वतीने तहसीलदार, नायब तहसीलदार, मुख्याधिकारी व अन्य असे नऊ अधिकारीदेखील स्ट्रॉग रुमच्या तपासणीसाठी नेमण्यात आले आहेत. शहरात २ डिसेंबरला मतदानाकरिता ७६ मतदान केंद्रे होती. त्यासाठी दोन बॅलेट युनीट आणि एक कंट्रोल युनीट तर तीन प्रभागामध्ये सहा केंद्रांवर तीन बॅलेट युनीट आणि एक कंट्रोल युनीट होते. ही सर्व मतदान यंत्रे चोख बंदोबस्तात ठेवण्यात आली आहेत.
२१ डिसेंबरला मतमोजणीच्या दिवसांपर्यंत कडक बंदोबस्त राहणार आहे. नेमणूक केलेल्या नऊ अधिकार्‍यांना दिवस वाटून दिले आहेत. त्यानुसार, कर्तव्य बजवावे लागत आहे. हे अधिकारी आठ तासांतून तीनवेळा स्ट्रॉग रुमची पाहणी करीत आहेत. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी शरद पाटील हे सुद्धा भेट देऊन वेळोवेळी स्ट्रॉग रुम व परिसरातील हालचालींवर लक्ष केंद्रीत करीत आहेत.