गडचिरोलीत नक्षलवादाला मोठा धक्का; ११ नक्षल्यांचे आत्मसमर्पण

    दिनांक :10-Dec-2025
Total Views |
गडचिरोली,
11 Naxalites surrender in Gadchiroli गडचिरोलीमध्ये आज नक्षलवादाविरोधातील मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. विविध हिंसक कारवायांमध्ये सहभागी असलेल्या ११ नक्षलवाद्यांनी पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले. या सर्वांवर मिळून तब्बल ८२ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते. आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये दोन विभागीय समिती सदस्य, तीन पीपीसीएम, दोन एसीएम आणि चार दलम सदस्यांचा समावेश आहे. यातील भामरागड दलमचा विभागीय समिती सदस्य रमेश उर्फ भिमा बाजू गुड्डी लेकामी आणि छत्तीसगडमधील पश्चिम बस्तर विभागीय समिती सदस्य भिमा उर्फ सितू उर्फ किरण हिडमा कोवासी हे विशेषत्वाने महत्त्वाचे नाव मानले जात आहे.

11 Naxalites surrender in Gadchiroli
 
याशिवाय पीएलजीए बटालियन क्रमांक एकचा पीपीसीएम पोरिये उर्फ लक्की अडमा गोटा, कंपनी क्रमांक ७ चे पीपीसीएम रतन उर्फ सन्ना मासू ओयाम, कमला उर्फ रागो इरिया वेलादी, एमएमसी झोनच्या कान्हा भोरमदेव दलमची एसीएम पोरिये उर्फ कुमारी भिमा वेलादी आणि कुतुल एरिया कमिटीचा एसीएम रामजी उर्फ मुरा लच्छू पुंगाटी आदींनीही शस्त्रास्त्रे खाली ठेवली. गडचिरोली पोलिस आणि सीआरपीएफच्या सातत्यपूर्ण दबावामुळे २०१५ पासून आतापर्यंत ११२ माओवादी कार्यकर्त्यांनी आत्मसमर्पणाचा मार्ग स्वीकारला आहे.
२००५ पासून अस्तित्वात असलेल्या शासनाच्या आत्मसमर्पण धोरणामुळे आणि पुनर्वसन प्रयत्नांमुळे आजवर ७८३ माओवादी गडचिरोली पोलिसांसमोर शरण आले आहेत. विशेष म्हणजे याच वर्षी माओवादी संघटनेच्या केंद्रीय समिती सदस्य मल्लोजुला वेणुगोपाल राव उर्फ भूपतीसह ६१ वरिष्ठ कॅडर सदस्यांनी आत्मसमर्पण केल्याने माओवादी चळवळीला मोठा धक्का बसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आत्मसमर्पण कार्यक्रमात पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी भूपतीच्या शरणागतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सी-६० पथकातील अधिकारी आणि जवानांचा सत्कार केला. तसेच गडचिरोली पोलिस दलाने तयार केलेल्या ‘प्रोजेक्ट उडान-वेध विकासाचा’ मार्गदर्शक पुस्तिकेचे अनावरणही त्यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी बोलताना शुक्ला यांनी सी-६० पथकाच्या धाडस आणि कार्यक्षमतांचे कौतुक केले. उर्वरित माओवादी कार्यकर्त्यांनीही हिंसेचा मार्ग सोडून लोकशाहीच्या प्रवाहात सामील व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाला अपर पोलिस महासंचालक डॉ. छेरिंग दोरजे, परिक्षेत्रीय पोलिस उप-महानिरीक्षक अंकित गोयल, पोलिस अधीक्षक नीलोत्पल आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.