कॅमेरा दुरुस्ती केंद्राच्या नावाखाली कारंजात ड्रगची निर्मिती

* अधिवेशनात आ. वानखेडेंनी उचलला प्रश्न

    दिनांक :10-Dec-2025
Total Views |
राहुल पैठने
कारंजा (घा.), 
drug-production-in-karanja : दोन दिवसांपूर्वी उशिरा रात्री नागपूर नारकोटिस पोलिसांनी गुप्त माहितीनुसार कारंजा येथील एका टिन शेडवर छापा टाकत एमडी ड्रग तयार करणार्‍या कारखान्याचा पर्दाफाश केला. पोलिसांनी सुमारे १९२ कोटी रुपये किमतीचा कच्चा माल जप्त केला असून शहरातील दोन तरुणांसह एका अल्पवयीन मुलाला अटक केली. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली. ऐन हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू असताना हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आ. वानखेडे यांनी अधिवेेशनात प्रश्न उपस्थित करून पोलिस प्रशासनावर चांगलेच ताशेरे ओढले.
 

jkh 
 
येथे ३० ते ३५ एकर विस्तीर्ण परिसरातील गोकुळ सिटी पिछला लेआऊटमध्ये वैभव अग्रवाल याचा प्लॉट आहे. दिवाळीपूर्वी या प्लॉटवर काही भागांमध्ये टिन शेड उभारण्यात आले होते आणि सुमारे ८-१० दिवसांपूर्वी संपूर्ण प्लॉटला हिरवी जाळी घालण्यात आली होती. परिसरात वस्ती नसल्याचा फायदा घेत वैभव उर्फ भय्यू अग्रवाल (३५), त्याचा सहकारी सोहम गायगोले (२१) यांनी त्या ठिकाणी कॅमेरा दुरुस्तीचे केंद्र सुुरू केले असल्याचे गावात पसरवले. सधन कुटुंबातील मुलगा असल्याने त्याच्यावर कोणीही संशय घेतला नाही. रात्री अपरात्री येथे वर्दळ वाढली होती. परंतु, त्याकडे कोणाचे फारसे लक्ष गेले नाही. दोन दिवसांपूर्वी नागपूर पोलिसांनी केलेल्या कारवाईने कारंजावासियांना चांगलाच धका बसला.
 
 
प्राथमिक माहितीनुसार, याठिकाणी पूर्वी हे युवक कॅमेर्‍यांचे दुरुस्तीचे काम करत होते. मात्र हिरवी जाळी लावल्यापासून मागील ८-१० दिवसांपासून येथे बेकायदा ड्रग उत्पादनाचे काम सुरू होते. हा प्लॉट कारंजा पोलिस स्टेशनपासून केवळ २ किलोमीटर अंतरावर आहे. आजूबाजूला वस्ती नसून शेती व पशुपालनाचा परिसर आहे. हे युवक सहसा रात्री येत आणि कधी-कधी, दोन—तीन दिवस दिसतही नसत. त्यामुळे कोणीही संशय घेतला नाही.
 
 
जप्त केलेले हे फक्त कच्चे रसायन असल्याचे सांगितले जात आहे. ते तयार होऊन विक्रीस गेले असते तर किंमत कोट्यवधींमध्ये पोहोचली असती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरात पालकांमध्ये मुलांच्या सुरक्षिततेबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी कारंजा पोलिस तैनात असून पुढील तपास सुरू आहे.
 
 
या प्रकरणाची चौकशी करू : मुख्यमंत्री फडणवीस
 
 
कारंजा घाडगे येथे टाकलेल्या छाप्यात करोडे रुपयांचे मादक पदार्थ सापडले. या संदर्भात आर्वीचे आ. सुमीत वानखेडे यांनी आपल्याला कालच माहिती दिली. या प्रकरणी पोलिसांनी योग्य कारवाई केली. या पुढील तपासही योग्य दिशेने होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील अधिवेशनात दिली. तसेच वर्धेचे पालकमंत्री व गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनीही कारवाई करण्याचे संकेत दिले.