नागपूर
Nilesh Rane कोकणात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर पावसाने परिसरात रस्ते आणि महामार्गांची स्थिती गंभीर बनवली आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना आमदार नीलेश राणे यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनाचे लक्ष वेधले.
आमदार राणे यांनी म्हटले की, “राज्याच्या अन्य भागात पडणारा पाऊस आणि कोकणातील पावसाची तीव्रता लक्षात घेता, कोकणाला मराठवाडा किंवा विदर्भाच्या निकषांऐवजी स्वतंत्र निकष लागू करावेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राज्यातील राज्य मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग व अन्य जिल्हा मार्ग यावर देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च केला जातो. मात्र, कोकणात प्रचंड पाऊस पडल्यामुळे हा खर्च वाया जातो. माझ्या मतदारसंघात गेल्या वर्षी चार हजार मिलिमीटर पाऊस पडला. अशा परिस्थितीत रस्ते टिकवणे कसे शक्य आहे?”नीलेश राणे यांनी कोकणातील रस्त्यांवर वाढत्या वाहतुकीचा संदर्भही दिला. “मोठ्या प्रमाणावर टूरिस्ट इकडे येतात. तसेच वाळू आणि डंपर वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. अशा परिस्थितीत रस्त्यांची गुणवत्ता टिकवली नाही, तर ती उध्वस्त होणारच,” असे ते म्हणाले. त्यांनी अधिक स्पष्ट करत पुढे सांगितले की, “जिथे पाऊस चार इंचही पडत नाही, त्या ठिकाणचे निकष जर कोकणातल्या रस्त्यांवर लागू केले, तर ते टिकणार नाहीत. दरवर्षी सरकार पैसे खर्च करते, तरीही रस्ते दुरुस्त होत नाहीत, ही आपलीच चूक आहे.”
नाराजी व्यक्त
आमदारांनी अधिकारी व ठेकेदारांवर नाराजी व्यक्त केली. “सहा महिने पाऊस पडल्यामुळे अधिकारी आणि ठेकेदार ढगांकडे बोट दाखवत आहेत. मागील बिलं काढली गेली नाहीत, त्यामुळे नवीन ठेकेदार घेण्यास अडथळा आहे. सरकारने दुरुस्तीला पैसे दिले, पाऊस जास्त पडला, परंतु खर्च व्यर्थ गेला. ठेकेदाराला कारण मिळाले, अधिकाऱ्यांना कारण मिळाले, पण रस्ते अजूनही दुरुस्त झालेले नाहीत,” असे त्यांनी अधोरेखित केले.नीलेश राणे यांच्या या मुद्द्यांमुळे कोकणातील रस्त्यांच्या दुरुस्ती प्रक्रियेतील अडचणी आणि पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर समस्यांकडे सरकारकडे लक्ष वेधले गेले आहे. आमदार राणे यांनी कोकणासाठी स्वतंत्र निकष लागू करण्यास आणि रस्त्यांच्या दुरुस्तीला त्वरित सुरुवात करण्याची मागणी केली आहे.