नवी दिल्ली,
DGCA issues stern notice to IndiGo chief इंडिगोमध्ये निर्माण झालेल्या अडचणींनंतर नागरी विमानवाहतूक महासंचालनालयाने कठोर भूमिका घेतली असून इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्स यांना समन्स जारी केले आहे. डीजीसीएने त्यांना गुरुवारी दुपारी ३ वाजेपर्यंत प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. कंपनीकडून उड्डाण रद्द होणे, विलंब, क्रूची उपलब्धता यांसारख्या मुद्द्यांवर सविस्तर अहवाल सादर करण्यासही सांगण्यात आले आहे.
डीजीसीएच्या आदेशानुसार, एल्बर्स यांना सर्व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बैठकीत उपस्थित राहावे लागणार असून सध्याच्या फ्लाइट ऑपरेशन्सशी संबंधित महत्वाची माहिती केबिन क्रूची संख्या, त्यांच्या ड्युटीचे तास, नियोजित उड्डाणांचे वेळापत्रक, रद्द झालेली उड्डाणे आणि प्रवाशांना दिलेल्या परतफेडीचे तपशील सादर करणे बंधनकारक आहे. इंडिगोच्या मोठ्या प्रमाणावर फ्लाइट रद्दीमुळे विमानतळांवर प्रवाशांची गैरसोय वाढली असून तिकीट काउंटरवर मोठी गर्दी दिसून आली. त्यामुळे डीजीसीएने याबाबत सखोल चौकशीसाठी चार सदस्यीय समिती नेमली आहे.
या समितीत वरिष्ठ अधिकारी सहभागी असून त्यांना फ्लाइट रद्द होण्यामागील खरी कारणे शोधण्याचे तसेच इंडिगोने ‘फ्लाइट ड्युटी टाइम लिमिट’ नियमांचे पालन केले आहे की नाही हे तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. डीजीसीए प्रमुख फैज अहमद किडवाई यांनी स्पष्ट केले की, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही एअरलाइन्सविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. इंडिगोवरील चौकशीचे निष्कर्ष येत्या काही दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.