नागपूर,
Discussion in the House on e-challan नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी मुंबईतील पार्किंग व्यवस्थापन आणि वाहनांच्या चलानासंदर्भातील अडचणींवर सभागृहात सविस्तर चर्चा झाली. मुंबईतील चाळींमध्ये किंवा त्यांच्या परिसरात योग्य पार्किंगची सुविधा नसल्याने नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी लक्ष वेधले. ट्रॅफिक पोलीस मोबाईलवर फोटो काढत असताना अनेकदा वाद निर्माण होतात, तसेच चलानाचे एसएमएस उशिराने मिळतात, अशी तक्रार त्यांनी मांडली. या प्रश्नांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चलानाची नोटीस उशिरा जाण्याचे प्रमाण मान्य केले. ही प्रक्रिया जलद करण्यासाठी पावले उचलली जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गोव्यात वापरल्या जाणाऱ्या बॉडी कॅमेऱ्यांप्रमाणेच तंत्रज्ञान महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने आणण्याची योजना असल्याची माहितीही त्यांनी दिली. या कॅमेऱ्यांमुळे रस्त्यावर होणारे वाद-विवाद किंवा भांडणांच्या घटना स्पष्टपणे नोंदवल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी ई-चलान प्रणाली फास्टॅगशी जोडण्याची शक्यता विचारली, कारण अनेक वाहनचालक चलान भरण्याकडे दुर्लक्ष करतात, अशी त्यांची भूमिका होती. यावर ठाकरे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी चलान न भरणाऱ्या वाहनधारकांना पेट्रोल-डिझेल देऊ नये, असा कठोर नियम लागू करण्याची मागणी केली. या सर्व सूचनांचा विचार करून चलान प्रक्रियेवर अधिक प्रभावी नियंत्रणासाठी एका वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. तसेच पुढील तीन महिन्यांत संबंधित नियमावली अंतिम करण्याचेही त्यांनी आश्वासन दिले.
दरम्यान, मोठ्या बांधकाम प्रकल्पांमध्ये दुचाकी पार्किंगची सुविधा न दिल्यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींबद्दलही सभागृहात चर्चा झाली. बीडीडी चाळ पुनर्विकासात सुरुवातीला पार्किंगचा अभाव होता, परंतु नंतर ती सुविधा देण्यात आली याची नोंद करून, आगामी सर्व प्रकल्पांमध्ये दुचाकी पार्किंग बंधनकारक करण्यासाठी नगरविकास विभागाकडून तातडीने आदेश देण्यात येतील, असेही उपमुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केले.