नागपूर,
dr dilip peshwa धातुकर्म शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन व्हीएनआयटीचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. दिलीप पेशवे यांना‘डिस्टिंग्विश्ड एज्युकेटर अवॉर्ड’ने गौरविण्यात आले. हा प्रतिष्ठित सन्मान आयआयटी हैद्राबाद येथे झालेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेटल्सच्या वार्षिक तांत्रिक अधिवेशनात प्रा. बी. एस. मूर्ती, संचालक, आयआयटी हैद्राबाद, कोमल कपूर, संचालक, न्यूक्लियर फ्युएल कॉम्प्लेक्स, बार्क यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. उपस्थित वैज्ञानिक, संशोधक, विद्यार्थी समुदायाने डॉ. पेशवे यांच्या दीर्घकालीन शैक्षणिक सेवेचे कौतुक केले.
या सन्मानामुळे डॉ. पेशवे यांचे धातुकर्म व पदार्थ अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रातील स्थान अधिक दृढ झाले असून, त्यांच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा प्रशंसनीय दखल घेण्यात आली आहे. चार दशकांहून अधिक काळाच्या समृद्ध शैक्षणिक कारकिर्दीत डॉ. पेशवे यांनी धातुकर्म व पदार्थ अभियांत्रिकी क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. त्यांनी व्हीआरसीई, नागपूर विद्यापीठातून बीई व एम.टेक. मध्ये प्रथम क्रमांक पटकावला असून 1993 मध्ये व्हीएनआयटीमधून पीएच.डी प्राप्त केली आहे. त्यांच्या संशोधनातील प्रमुख विषयांमध्ये फिजिकल मेटलर्जी, ट्रायबोलॉजी, इंजिनिअरिंग मटेरियल्सचा वेअर, पॉलिमर्स अँड कॉम्पोझिट्स, नॅनोमटेरियल्स यांचा समावेश आहे.dr dilip peshwa त्यांनी 22 हून अधिक पीएच.डी. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, 300 पेक्षा जास्त संशोधन प्रकाशने, 9 पेटंट्स, 12 पुस्तके, 25 शासकीय निधीतून चालणारी आर अँड डी प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले असून सध्या एनआरबी, एनएएल, बीआरएनएस, यूजीसी-डीएई, एयूएससी, केव्हीआयसी सारख्या संस्थांसह पाच मोठ्या प्रकल्पांवर कार्यरत आहेत. त्यांना डॉ. धरणीधर गांधी समाज शिक्षक गौरव पुरस्कार, जवाहरलाल नेहरू मेमोरियल ट्रस्ट पुरस्कार, आयआयएम-एसएआयएल सुवर्णपदक, केव्हीआयसीचा बेस्ट एस अँड टी इनोव्हेशन अवॉर्ड असे अनेक मानाचे सन्मान प्राप्त झाले आहेत. ते विविध व्यावसायिक संस्थांचे सक्रिय सदस्य असून ग्रामीण तंत्रज्ञान विकास व सामाजिक कार्यातही महत्त्वाची भूमिका बजावतात.