बारामतीत ईडीची धडक कारवाई; दूध डेअरी घोटाळ्याने उडाली खळबळ

    दिनांक :10-Dec-2025
Total Views |
बारामती,
ED action in Baramati बारामतीमध्ये आज सकाळपासून सक्तवसुली संचालनालयाच्या पथकांनी छापेमारीची कारवाई सुरू केली असून, आनंद सतीश लोखंडे आणि विद्या सतीश लोखंडे यांच्या जळोची गावातील निवासस्थानी तपास सुरू आहे. पुणे आणि मुंबईतील दूध डेअरीव्यवसायिकांना तसेच मंत्रालयातील काही कर्मचाऱ्यांना सुमारे १० कोटी रुपयांना गंडवल्याच्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. बारामती डेअरी प्रायव्हेट लिमिटेडने दाखल केलेल्या तक्रारीनंतर लोखंडे दाम्पत्यावर १०.२१ कोटी रुपयांच्या व्यापक फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तपासात हे उघडकीस आले आहे की, तरुण उद्योजक असल्याचे भासवत आणि स्वतःला एका प्रभावशाली राजकीय नेत्याचे समर्थक म्हणवत या जोडप्याने अनेकांना गुंतवणुकीचे आमिष दाखवले.
 
ED action in Baramati 
 
 
बारामती तालुक्यात विविध नावांनी कंपन्या उघडून त्यांनी मोठ्या प्रमाणात रक्कम उकळल्याचे आरोप आहेत. फसवणुकीच्या पद्धतीही चकित करणाऱ्या आहेत. मुंबईतील एका कंपनीकडून दोन कोटी रुपयांचे लोणी उधारीवर घेतले आणि आठवड्यात पैसे देण्याचे आश्वासन दिले; मात्र एकही हप्ता भरला नाही. दूध पुरवठ्याच्या नावाखाली ९३ लाख रुपये घेतले गेले पण प्रत्यक्षात दूधच पुरवले गेले नाही. दूध व्यापारातील लाभ देण्याच्या नावाखाली सादर केलेल्या ६.४३ कोटी रुपयांच्या बिलांचा निधीही गैरवापरित झाला. अनेक व्यवहारांत दिलेले धनादेश बाउन्स झाले.
 
या जोडप्याने मंत्रालयातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही गुंतवणुकीचे आमिष दाखवल्याचे समोर आले असून, संबंधित अधिकाऱ्यांनी मुंबई आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रारी नोंदवल्या आहेत. त्या अनुषंगाने ईडीने आज बारामतीत छापेमारी करून कागदपत्रे, डिजिटल नोंदी आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू केली आहे. या कारवाईमुळे बारामती परिसरात खळबळ उडाली असून, या फसवणूक जाळ्यात आणखी किती लोक अडकले आहेत याबाबत ईडीचा तपास सुरू आहे.