आठ दशकांची लगबग थांबली!

    दिनांक :10-Dec-2025
Total Views |
 
वेध
dr baba adhav श्रमिक आणि असंघटीतांच्या हक्कासाठी लढणाèयांच्या मांदियाळीत अनेक जण आपल्यास त्यांच्या कर्तृत्वाने खुणावून जातात. पण कायम स्मरणात राहणारे काहीच मोजकेच! महाराष्ट्राच्या श्रमिक चळवळीचे आधारस्तंभ म्हणून ज्यांनी स्वतःला सिद्ध केले असे, डॉ. बाबा आढाव यांचे जाणे असंघटीत कामगारांचे पितृछत्र हिरावण्यारखे आहे. 80 वर्ष कष्टकऱ्यांसाठी दिलेला लढा आणि त्यातील एक एक आंदोलन बाबांच्या संघटन सामर्थ्याची ओळख देते.
 
 

बाबा आढाव  
 
 
कामगारांचे अनेक नेते महाराष्ट्राला लाभले. कामगारांच्या भल्यासाठी रस्त्यावर उतरुण रान पेटविणारे महाराष्ट्राने पाहिले पण् जिद्द, चिकाटी आणि सचोटीने लढा देत श्रमिक, असंघटीत, शोषितांना शेवटच्या क्षणापर्यंत जपणारा म्हणून डॉ. बाबा आढावा यांना नक्कीच ओळखले जाईल. 1930 ते 2025 अशा 80 वर्षाची कारकिर्द त्यांनी आपल्या संघटन कौशल्य, ताठरबाणा आणि असंघटीतांच्या न्याय हक्कासाठी घालविली. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि श्रमिक चळवळीचे आधारस्तंभ म्हणून उदयास आलेल्या बाबा आढाव यांनी गांधीजींच्या चलेजाव आंदोलनातून सामाजिक कार्याला सुरुवात केली. त्यावेळी ते शालेय जीवन जगत होते. वैद्यकीय शिक्षण घेत, वैद्यकीय सेवा काही काळ दिल्यानंतर असंघटीत कामगारांचे दूःख त्यांना अस्वस्थ करु लागले आणि तेथूनच त्यांच्या नेतृत्वाने वेगळे वळण घेतले. असंघटीत क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि निवृत्ती वेतन मिळावे हा त्यांचा आग्रह होता आणि याच धर्तीवर त्यांचा कामगार नेते म्हणून प्रवास सुरु झाला. त्यांच्यात असलेल्या प्रतिभेच्या जोरावर शांततेच्या मार्गाने अनेक आंदोलन यशस्वी करीत त्यांनी कष्टकऱ्यांना न्याय दिला. शांततेच्या मार्गाने केलेल्या आंदोलनातून व्यवस्थेला झुकविण्याचे सामर्थ्य त्यांच्यात होते. असंख्य असंघटीत कामगारांचे संघटन करुन त्यांना एकसंघ ठेवीत त्यांच्यासाठी लढण्याची प्रतिभा वेळोवेळी त्यांच्या आंदोलनातून दिसून आली. म्हणून असंघटीत श्रमितांचे पिता म्हणूनही त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती.
सरकार, सत्ता याचा जराही परिणाम त्यांच्यावर होत नसे! म्हणूनच तर धरणग्रस्तांसाठी यशवंतराव चव्हाण यांच्या विरोधात तर पाठ्यपुस्तकात साईबाबांचे धडे येऊ नये म्हणून शंकरराव चव्हाण यांच्या विरोधात आंदोलन करण्याचे धाडस त्यांनी दाखविले. यशवंतराव चव्हाण ते शंकरराव चव्हाण अशा दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या कालखंडात संघर्षाचा विस्तृत पट लिहिण्याचे काम बाबा यांनी केले.
कामगारांचे हक्क हा बाबांचा प्राण होता. म्हणूनच तर त्यानी असंघटीत असलेल्या हमालांना एकत्रित आणून ‘हमाल पंचायत’ची स्थापना केली. जातीय भेदाभेदाच्या विरोधात लढ देताना ‘ एक गाव एक पाणवठा’ ही क्रांतीकारी चळवळ उभी करणारे बाबा कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढतानाच समाजातील अस्पृश्यता दूर करण्यासाठीही धडपडताना दिसले. केवळ एकच ध्येयाने प्रेरीत होऊन काम न करता, समाजातील बोचèया प्रथाही बाबांनी मोडीत काढण्यासाठी पूढाकार घेत समाजभान जपण्याचे काम केले. ज्यावेळी निळूभाऊ लिमये, जॉर्ज फर्नांडीस, सदाशिव बागाईतकर, इंदूताई केळकर, मृणाल गोरे ही कामगार चळवळीतील मंडळी आपआपल्या कामाने क्षितीजावर चमकत होती, त्यावेळी बाबा आढाव नावाचा ताराही आपल्या संघटन कौशल्याच्या जोरावर लक्षेवधी ठरीत होता.
विधायक आणि रचनात्मक कामांचा मापदंड निर्माण करताना, त्यांनी ध्येयवादी कार्यकर्त्यांची फळी घडविली. सरकारी पुरस्कार म्हणजे सरकारी बेडी म्हणून महाराष्ट्र भुषण पुरस्कार नाकारताना मला कष्टकèयांशी असलेले नातेच अबाधित ठेवायचे आहे असे सांगणारे बाबा किती निस्वार्थी लढले असतील, याची कल्पना येते. अख्खी हयात ज्यांनी रस्त्यावरील मोर्चे आणि आंदोलनाच्या माध्यमातून असंघटीतांशी लढा दिला, त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत आंदोलने केली. मतदान यंत्रणाच्या विरोधातही रस्त्यावर उतरुण आवाज उठविणारे बाबाच होते! 53 हून अधिक वेळा तरुंगवास भोगूनही कायम लढण्यासाठी सज्ज राहणारे बाबा आढाव यांचे जाणे असंख्य असंघटीतांना पोरके करुन गेले. कष्टकरी जगाला आठ दशके ज्यांनी लगबगीची सवय लावली, ती आता थांबली! हक्क आणि सामाजिक सुरक्षेसाठी समर्पित एका ध्येयनिष्ठ नेतृत्वाला महाराष्ट्र पोरका झाला.
विजय निचकवडे
9763713417