रोजगारक्षम अभ्यासक्रमावर भर द्या : ना. मंगल प्रभात लोढा

*न्यू एज आणि अल्पकालीन अभ्यासक्रमांचा घेतला आढावा

    दिनांक :10-Dec-2025
Total Views |
वर्धा, 
mangal-prabhat-lodha : रोजगार ही एक मोठी समस्या आहे. लोकसंख्या वाढीनुसार रोजगार सुद्धा वाढविणे गरजेचे असून त्यावर ठोस मार्ग काढणे आवश्यक आहे. उद्योग क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी शासकीय आयटीआय, तंत्रनिकेतन येथे परंपरागत अभ्यासक्रमासोबतच नवीन तंत्रज्ञानावर आधारित रोजगारक्षम अभ्यासक्रमावर भर द्या अशा सुचना कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिल्या.
 
 
 
k
 
 
 
जिल्हाधिकारी कार्यालयात आज १० रोजी अल्पकालीन अभ्यासक्रम व मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेचा आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी वान्मथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन, व्यवसाय व प्रशिक्षण नागपूर विभागाचे सहसंचालक पुरषोत्तम देवतळे, कौशल्य विकास नागपूर विभागाचे उपायुत प्रकाश देशमाने, सहाय्यक आयुक्त निता औघड, जिल्हा समन्वयक सागर आंबेकर, शासकीय आयटीआयचे प्राचार्य, उद्योजक आदी उपस्थित होते.
 
 
ना. लोढा पुढे म्हणाले की, रोजगाराच्या संधी वाढविण्याची आवश्यकता आहे. कोणत्याही उद्योग क्षेत्रात काम करण्यासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असते. कुशल मनुष्यबळ तयार करुन स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी शॉर्ट टर्म व न्यू एज अभ्यासक्रम सुरू करण्यात आले असून त्याबाबतची जनजागृती करावी. स्वयंरोजगार अभ्यासक्रमावर भर देऊन शॉर्ट टर्म अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करा, असे ते म्हणाले.
 
 
ग्रामीण भागांमध्ये अल्पकालीन अभ्यासक्रमाची माहिती पोहोचविण्यासाठी नियोजन करा. तांत्रिक बाबींसोबतच व्यवस्थापन अभ्यासक्रम सुद्धा शिकविण्यावर भर द्या, आगामी काळात आयटीआयमध्ये इनोव्हेशन सेंटर सुरू करणार असून इतरही अभ्यासक्रमाचे नियोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
तर पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी जिल्ह्यात मोठे उद्योग कमी प्रमाणात आहेत. परंतु, सिंदी (रेल्वे) येथील ड्रायपोर्ट लवकरच सुरू होणार आहे. हिंगणी भागात फार्मास्युटिकल कंपनी, टाटांच्या माध्यमातून कौशल्यवर्धन केंद्र, यशवंतराव चव्हाण मुत विद्यापिठाचे कौशल्य विकास केंद्र याभागात सुरू होणार असून त्यातून कुशल मनुष्यबळ तयार होणार असल्याचे ना. भोयर यांनी सांगितले. जिल्ह्यात महिला बचत गट, शेतकरी लस्टर, कॉटन जिनींग आदी उद्योग असून वायगाव हळद दुबईला पाठविण्यात आली. कौशल्य विकास विभागाने जिल्ह्यातील उद्योगांना त्यांच्या आवश्यकतेनुसार मनुष्यबळ तयार करावे, असेही ते म्हणाले. यावेळी ना. लोढा यांनी मुख्यमंत्री स्वयंरोजगार, अल्पकालीन अभ्यासक्रम, न्यू एज अभ्यासक्रम आदींचा सविस्तर आढावा घेतला.