कोलकाता,
Humayun Kabir's challenge to Mamata पश्चिम बंगालमध्ये राजकीय हालचालींना जोर येत असताना तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार हुमायून कबीर यांनी स्वतःचा नवीन पक्ष स्थापन करण्याची औपचारिक घोषणा केली आहे. मुर्शिदाबादमध्ये बाबरी मशिदीची प्रतिकृती उभारण्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर पक्षातून बाहेर केलेल्या कबीर यांनी आता थेट मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आव्हान देत निवडणुकीत ‘गेम चेंजर’ ठरण्याचा दावा केला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना कबीर यांनी AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्याशी झालेल्या संवादाचा उल्लेख करत एक ठळक विधान केले. “मी ओवेसींशी बोललो आहे. त्यांनी मला सांगितले की ते हैदराबादचे ओवेसी आहेत आणि मी बंगालचा ओवेसी आहे. येत्या १० डिसेंबरला मी कोलकात्यात जाऊन माझ्या पक्षासाठी एक समिती स्थापन करणार आहे. १२ डिसेंबर रोजी लाखो समर्थकांच्या उपस्थितीत पक्षाची घोषणा करेन,” असे कबीर म्हणाले.
कबीर यांनी स्पष्ट केले की त्यांचा तृणमूल काँग्रेसच्या मुस्लिम मतपेढीला तडा देण्याचा कोणताही उद्देश नसला तरी ते मुस्लिम समाजासाठी स्वतंत्र आवाज तयार करू इच्छितात. राज्यातील सुमारे २७ टक्के मुस्लिम मतदारांपैकी मोठा हिस्सा तृणमूल काँग्रेसकडे असल्यामुळे कबीर यांच्या हालचालींमुळे पक्षाचे गणित बिघडू शकते, अशी चर्चा सुरू आहे. “मी मुस्लिमांसाठी काम करणारा एक नवीन पक्ष उभारणार आहे. १३५ जागांवर उमेदवार उभे करेन आणि बंगालच्या आगामी निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावेन,” असा आत्मविश्वास कबीर यांनी व्यक्त केला. तसेच, AIMIMसोबत संयुक्तरीत्या निवडणूक लढवण्याबाबतही ते सकारात्मक असल्याचे त्यांनी सूचित केले. मात्र, AIMIM किंवा असदुद्दीन ओवेसी यांनी त्यांच्या दाव्यांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. कबीर यांच्या या घोषणेनंतर बंगालच्या राजकारणात नवीन समीकरणे तयार होण्याची शक्यता वाढली आहे.