नागपूर,
IIM Nagpur वनव्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी आणि सामान्य जनते पर्यंत सरकारी सेवांचे लाभ अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी भारतीय प्रबंध संस्थान (आयआयएम) नागपूर आणि चंद्रपूर वन प्रशासन, विकास आणि व्यवस्थापन अकादमी यांच्या दरम्यान बुधवारी सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार आयआयएम नागपूर वनक्षेत्रात कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आधुनिक व्यवस्थापन, नेतृत्व, संवादकौशल्य, सार्वजनिक धोरण (पॉलिसी) विश्लेषण आणि शाश्वततेविषयी प्रशिक्षण देणार आहे. या प्रशिक्षणाचा थेट फायदा नागरिकांना आणि जंगलावर अवलंबून असलेल्या समुदायांना होणार आहे.
सी. एफ. ए. च्या वतीने महाराष्ट्र वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि सी. एफ.ए. चे संचालक एम. श्रीनिवास रेड्डी यांनी तर आय. आय. एम. नागपूर च्या वतीने संचालक प्रा. भीमराया मेत्री यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या वेळी सी. एफ. ए. चे प्राचार्य व अतिरिक्त संचालक उमेश वर्मा, तसेच आय. आय. एम. नागपूरचे प्रा. अनूप कुमार आणि कार्यकारी शिक्षण कार्यक्रमांचे अधिष्ठाता प्रा. आलोक कुमार सिंह उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रा. मेत्री यांनी या कराराच्या माध्यमातून तयार होणारे अभ्यासक्रम राष्ट्राच्या सर्वांगीण विकासात योगदान देतील असा विश्वास व्यक्त केला. “वनअधिकाऱ्यांची नेतृत्वक्षमता आणि व्यवस्थापन कौशल्ये अधिक सक्षम झाली तर वनसंपत्तीचे सुयोग्य नियोजन शक्य होईल. परिणामी ग्रामीण नागरिकांचे सशक्तीकरण होईल. सध्या आपल्यापुढे असलेल्या पर्यावरणाशी संबंधित समस्या सोडवणे सोपे होईल, शिवाय शाश्वत विकासाचे आपले लक्ष्य गाठणेसुद्धा शक्य होईल. या सहकार्यामुळे चांगल्या प्रशासनाचा थेट फायदा सामान्य लोकांपर्यंत पोहोचेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.एम.एस. रेड्डी यांनी या कराराचे महत्त्व सांगताना याचा थेट संबंध सामान्य जनजिवनाशी असल्याचे सांगितले.
“आजच्या काळात वनीकरण हे केवळ संवर्धनापुरते मर्यादित नाही. आय. आय. एम. नागपूरच्या व्यवस्थापन तज्ञांकडून प्रशिक्षण घेतलेले आमचे अधिकारी अधिक वैज्ञानिक, पारदर्शक आणि लोककेंद्रित पद्धतीने काम करू शकतील. याचा थेट फायदा नागरिकांना आणि वनावर अवलंबून असलेल्या समुदायांना मिळणार आहे,” असे ते म्हणाले.या सहकार्याची शैक्षणिक बाजू स्पष्ट करताना प्रा. अनूप कुमार म्हणाले की, दोन्ही संस्था मिळून नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन, नेतृत्व-विकास, टीम बिल्डिंग, शाश्वतता आणि वनआधारित उद्योजकता यांचा समावेश असलेले प्रशिक्षण कार्यक्रम तयार करत आहेत. हे कार्यक्रम ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीचा समन्वय साधून रचले जात आहेत. “अधिकाऱ्यांच्या निर्णयक्षमतेत वाढ करून वनक्षेत्रातील नागरिकांशी समन्वय साधण्याची त्यांची कार्यक्षमता वाढवणे हे आमचे उद्दिष्ट आहे. यात कार्यरत वन अधिकारी, कर्मचारी, आणि या क्षेत्रात कार्य करणाऱ्या अन्य लोकांना सहभागी होता येईल. प्रशिक्षाचा काही भाग नागपूरला आय. आय. एम. मध्ये तर काही भाग चंद्रपूअरला अकादमीमध्ये घेतला जाईल. याशिवाय, ऑनलाइन पद्धतीने अनेक तज्ञ विविध ठिकाणावरून सहभागी होऊन मार्गदर्शन करतील.”
या कराराअंतर्गत प्रशिक्षण, संशोधन, सल्लागार प्रकल्प, सार्वजनिक धोरण, शाश्वत वनीकरण, पर्यावरणीय सेवांचे नियोजन तसेच इतर संबंधित उपक्रमांवर दोन्ही संस्था संयुक्तरीत्या काम करणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांची, प्रशिक्षणार्थ्यांची व तज्ज्ञ व्यक्तींची देवाणघेवाणही केली जाणार आहे.
महाराष्ट्र वन विभागांतर्गत कार्यरत सी. एफ. ए. ही स्वायत्त संस्था असून वनीकरण, पर्यावरण, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन आणि हवामान बदल या क्षेत्रांत शिक्षण व संशोधनाला चालना देते. आय. आय. एम. नागपूरसोबतच्या या सहकार्यातून वनव्यवस्थापन अधिक मजबूत होईल, गावकऱ्यांच्या उपजीविकेला नवे पर्याय निर्माण होतील, सरकारी यंत्रणेची कार्यक्षमता वाढेल आणि शाश्वत विकासाचे प्रयत्न अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.