नागपूर,
Leopard enters Nagpur city नागपूर शहरातील शिवनगर पारडी परिसरात आज सकाळी बिबट्या शिरल्याने एकच खळबळ उडाली. अचानक शिरलेल्या या बिबट्याने परिसरातील चार जणांवर हल्ला केला. सर्व जखमींवर भवानी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. घटनास्थळी मोठी गर्दी जमल्याने पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी तातडीने बंदोबस्त वाढवला. दरम्यान वनविभाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले असून रेस्क्यू सुरु करण्यात आले आहे.
माहितीनुसार, सकाळी स्थानिकांना बिबट्याचे दर्शन होताच तो पळू लागला यात त्याने जवळ उभ्या असलेल्या एका व्यक्तीवर झडप घातली. त्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात त्याने आणखी तीन जणांना जखमी केले. नागरिकांनी माहिती दिल्यानंतर वन विभागाची रेस्क्यू टीम तातडीने दाखल झाली आणि परिसराची तपासणी सुरू केली. बिबट्या अद्यापही सापडलेला नसून रेस्क्यू टीमकडून शोधमोहीम सुरू आहे. नागरिकांना घराबाहेर अनावश्यकपणे न पडण्याचे आणि कोणतीही हालचाल दिसल्यास तत्काळ प्रशासनाला कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान याच परिसरात तीन दिवसापूर्वी बिबट्या दिसला असून हा तोच असल्याच्या चर्चा सुरू आहे.