ओस्लो,
Maria Machado will be absent नॉर्वेतील ओस्लोमध्ये २०२५ चा नोबेल शांतता पुरस्कार जिंकणाऱ्या व्हेनेझुएलाच्या नेत्या मारिया कोरिना मचाडो या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. नोबेल संस्थेच्या संचालकांनी सांगितले की मचाडो बुधवारी होणाऱ्या समारंभात येऊ शकणार नाहीत. त्यामुळे पुरस्कार त्यांच्या जागी मुलीमार्फत स्वीकारला जाईल. गेल्या ११ महिन्यांपासून मचाडो सार्वजनिक ठिकाणी दिसले नाहीत. नोबेल संस्थेचे संचालक क्रिस्टियन बर्ग हार्पविकेन यांनी सांगितले की, समारंभाच्या दिवशी मचाडो ओस्लो येथे उपस्थित राहणार नाहीत. त्यांच्या प्रवक्त्या क्लॉडिया मसेरो यांनीही पुष्टी केली की मचाडो सोहळ्यात थेट उपस्थित राहणार नाहीत, पण दिवसाच्या उर्वरित कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची आशा आहे.
समारंभात अनेक लॅटिन अमेरिकन नेते उपस्थित राहणार आहेत, ज्यात अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेवियर मिलेनी, इक्वेडोरचे अध्यक्ष डॅनियल नोबोआ, पनामाचे अध्यक्ष जोसे राउल मुलेनो आणि पॅराग्वेचे अध्यक्ष सॅंटियागो पेना यांचा समावेश आहे. मचाडो ९ जानेवारीपासून भूमिगत आहेत. कराकसमध्ये निषेधात सहभागी झाल्यानंतर काही काळासाठी त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. नोबेल समितीने मचाडोला "वाढत्या अंधारात लोकशाहीची ज्योत तेवत ठेवणारी महिला" म्हणून वर्णन केले आहे. त्यांनी व्हेनेझुएलाच्या प्राथमिक निवडणुकीत विरोधी उमेदवार म्हणून भाग घेतला होता, परंतु सरकारने त्यांना निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवले.
नोबेल पुरस्कारांच्या परंपरेनुसार, जेव्हा विजेते प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नाहीत, तेव्हा जवळच्या कुटुंबातील सदस्य त्यांचे प्रतिनिधित्व करतो. याआधी २०२३ मध्ये इराणी कार्यकर्त्या नर्गेस मोहम्मदी आणि २०२२ मध्ये बेलारूसच्या मानवाधिकार कार्यकर्ते एलेस बियालियात्स्की यांच्या बाबतीत असेच घडले होते. मारिया कोरिना मचाडो यांच्या बाबतीतही त्यांच्या मुलीमार्फत पुरस्कार स्वीकारला जाईल.