अदामावा,
Massacre in Nigeria ईशान्य नायजेरियातील अदामावा राज्यात निदर्शक महिलांवर सैनिकांनी गोळीबार केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. लामुर्डे परिसरातील मुख्य रस्त्यावर जातीय संघर्ष हाताळण्याच्या पद्धतीविरोधात शांततापूर्ण निदर्शने करणाऱ्या महिलांना सैन्याने रोखण्याचा प्रयत्न केला असता परिस्थिती बिघडली आणि गोळीबार झाला. प्रत्यक्षदर्शी आणि मृतांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात नऊ महिलांचा मृत्यू झाला असून किमान दहा लोक जखमी झाले आहेत.
नायजेरियन सैन्याने मात्र कोणत्याही हत्या केल्याचे स्पष्टपणे नाकारले असून स्थानिक मिलिशियाच गोळीबारासाठी जबाबदार असल्याचा दावा केला आहे. परंतु अॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या नायजेरिया कार्यालयाने साक्षीदारांचे बयान आणि कुटुंबीयांच्या माहितीसह सत्यता पडताळून सैनिकांनीच निदर्शकांना लक्ष्य केल्याची पुष्टी केली आहे. नायजेरियात सुरक्षादलांकडून अशा प्रकारचे अतिप्रसंग नवे नाहीत. २०२० मध्ये लागोसमधील पोलिस अत्याचारविरोधी आंदोलनादरम्यानही निदर्शकांवर अचानक गोळीबार झाला होता आणि अधिकृत चौकशीत त्याला ‘हत्याकांड’ म्हटले गेले होते.
अदामावातील बाचमा आणि चोबो वांशिक समुदायांमधील जमिनीच्या वादातून सुरू असलेल्या संघर्षामुळे या भागात आधीच कर्फ्यू लागू होता. स्थानिक नगरसेवक लॉसन इग्नेशियस यांनी सांगितले की सुरक्षा दल व सैनिकांकडून कर्फ्यूची प्रभावी अंमलबजावणी न केल्याने नागरिक तीव्र नाराज होते आणि त्यातूनच निदर्शने उभी राहिली. गोळीबारात मृत झालेल्या एका तरुणीची आई, गील केनेडी, यांनी सांगितले की सैनिक घटनास्थळ सोडत असताना त्यांनी निदर्शक महिलांना पाहिले. सुरुवातीला एका सैनिकाने हवेत गोळीबार केला आणि काही क्षणांतच गर्दीवर थेट गोळ्या झाडल्या.