वर्धा जिल्ह्यावर १९२ कोटींचा मेफेड्रोन हल्ला

आ. वानखेडेंची विधानसभेंत केली कठोर कारवाईची मागणी

    दिनांक :10-Dec-2025
Total Views |
कारंजा (घा.), 
sumit-wankhede : जी समस्या आजवर केवळ महानगरांची डोकेदुखी होती, ती ’ड्रग्ज’ची भीषणता आता महात्मा गांधींच्या विचारांचा वारसा असलेल्या वर्धा जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कारंजा (घा.) येथे येऊन ठेपल्याने मोठी खळबळ उडाली आहे. कारंजा (घा.) येथे डिरेटोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सने केलेल्या मोठ्या कार्यवाहीत, अतिशय घातक समजल्या जाणार्‍या मेफेड्रोन या अमली पदार्थाचा तब्बल १९२ कोटी रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. वर्धा जिल्ह्याची ओळख गांधी जिल्हा आणि दारूबंदीमुळे असताना करोडो रुपयांचे ड्रग्ज पकडले जाणे ही घटना जिल्ह्याच्या भविष्यासाठी अत्यंत गंभीर आणि चिंतेची बाब बनली आहे.
 

sumit 
 
या धक्कादायक घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आ. सुमित वानखेडे यांनी हा विषय विधानसभेत उचलून धरला. डिरेटोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स द्वारे मतदारसंघातील कारंजा (घा.) येथे करण्यात आलेल्या कार्यवाहीनंतर अतिशय घातक समजल्या जाणार्‍या मेफेड्रोन या अमली पदार्थाचा १९२ कोटीचा साठा मिळाला. याबाबत सभागृहात कठोर कारवाई करण्याची मागणी आ. वानखेडे यांनी केली. हे विष आता थेट शेतकरी पुत्रांच्या दारावर येऊन पोहोचले आहे, जे तरुण पिढीचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते.
 
 
याप्रकरणी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र चिंता व्यक्त केली आणि केवळ आरोपींना पकडून न थांबता या नशाखोरीच्या आंतरराष्ट्रीय साखळीचा मुळापासून बिमोड करण्याची मागणी सभागृहात केली आहे. करोडो रुपयांचे ड्रग्ज बनविण्याकरिता कच्चा माल कारंजापर्यंत पोहोचणे, हे यामागे मोठे आणि संघटित रॅकेट कार्यरत असल्याचे दर्शवते. तरुण पिढीला या व्यसनाच्या विळख्यातून सुरक्षित ठेवण्यासाठी लोकांचे आयुष्य वाचवण्यासाठी आणि गांधी जिल्ह्याची प्रतिमा जपण्यासाठी दोषींवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे असे ते आक्रमकपणे म्हणाले. नागपुरातील संबंधीत विभागाला या प्रकरणाची माहिती असणे आणि वर्धा जिल्ह्य़ातील पोलिसांना या प्रकारची कल्पनाही नसणे ही बाब लाजीरवाणी असल्याने याचा एसआयटीकडून तपास करण्याची मागणी आ. वानखेडे यांनी केली.