तभा वृत्तसेवा
नेर,
Milamili River bridge, शहरातून वाहणारी व पुढे नेर ते बाभुळगाव रस्ता पार करून पाथ्रड गोळे येथील धरणात सामावणारी मिलमिली नदीवर विषेशतः पावसाळ्यात वाहतुकीसाठी अडथळा होवू नये म्हणून मोठा पुल बांधण्यात आला आहे. साधारणपणे नदी पात्रापासून पुलाची उंची दहा ते पंधरा फूट आहे. सध्याच्या परिस्थितीत ह्या पुलावरील संरक्षक कठड्याला बसवलेले लोखंडी पाईप एका नंतर एक सर्वच गायब झालेले आहेत.
या पुलावरून नेर ते बाभुळगाव अशी मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. शाळकरी विद्यार्थी एसटी व खाजगी वाहनाने मोठ्या प्रमाणात शहरात येतात. सोबतच मालवाहू गाड्यांची वर्दळ असते. पुलाच्या अलीकडे व पलीकडे मोठ्या प्रमाणात रस्ता खड्डेमय असल्याने व नेमका वळणाचा रस्ता आहे. त्यामुळे पुलाला संरक्षक पाईप नसल्याने मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. एवढा महत्वाचा रस्ता व गंभीर प्रश्न असूनही संबधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे एखादा अपघात होण्याची वाट न बघता लवकरात लवकर पुलावरील कठड्याला संरक्षक पाईप बसवण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.