नागपूर,
Nagpur leopard's struggle नागपूरच्या शिवनगर परिसरात गुरुवारी पहाटे बिबट्याच्या अचानक प्रवेशामुळे मोठी खळबळ उडाली. दाट लोकवस्तीमध्ये हा वन्यप्राणी शिरताच लोकांनी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आणि पहाटे साडेपाच ते सहाच्या सुमारास त्याने चार जणांना जखमी केले. माहिती मिळताच पोलिसांनी परिसर सील करून बिबट्या लपून बसलेल्या घराभोवती कडक पहारा ठेवला.
वनविभागाची पथके घटनास्थळी दाखल झाल्यानंतर रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झाली. बिबट्याला शांत करण्यासाठी त्याच्या शरीरावर गुंगीचे औषध असलेले दोन डार्ट मारण्यात आले. औषध शरीरात उतरू लागल्यावर त्याला गुंगी जाणवू लागली; मात्र त्याचा जोर कमी झाला नव्हता. नशेच्या अवस्थेतही बिबट्याने तब्बल १५ फूट उंच उडी मारत शेजारच्या गच्चीत जाण्याचा प्रयत्न केला. पण दृष्टी धूसर झाल्यामुळे तो योग्यरित्या चढू शकला नाही आणि काही क्षण धडपडीनंतर खाली कोसळला.
खालून बघ्यांची मोठी गर्दी, सतत होणारा ओरडाओरड आणि आवाज यामुळे रेस्क्यू टीमला प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागले. तरीही औषधाचा प्रभाव वाढत जाताच बिबट्या अशक्त झाला आणि खाली पडल्यावर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. जवळपास एक तास रंगलेल्या या थरारक कारवाईनंतर अखेर बिबट्याला सुरक्षितरीत्या पकडण्यात आले असून जखमींच्यावर उपचार सुरू आहेत.