नागपूर,
nagpur-temperature : उत्तर भारतातून येणार्या थंड वार्यांचा प्रभाव विदर्भात स्पष्टपणे जाणवत आहे. गेल्या चार-पाच दिवसांत तापमानात तब्बल तीन अंशांनी घट झाली असून बुधवारी ८.० अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. नागपूर शहरात थंडीने पुन्हा एकदा जोर दाखवला आहे. मंगळवारी ८.८ सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती. थंड वार्यांमुळे शहरात थंडीचा कडाका जाणवत आहे. सोमवारचा पारा ९.४ अंशांवर होता, रविवारी तापमान ८.५ अंशांपर्यंत घसरले होते. तर मंगळवारी ८.८ अंशांवर होते. दररोज होत असलेल्या या घसरणीमुळे शहरात थंडीचा कडाका वाढला आहे.
हिवाळी अधिवेशनाकरिता आलेल्या इतर शहरातील अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी आदींना नागपुरी अनुभव येत आहे.रात्रीच्या थंडीत शेकोटया पेटविण्याशिवाय अनेकांसमोर पर्याय नसल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येत आहे. गणेशपेठच्या बैद्यनाथ चौकातील नेपाळी स्वेटर विक्रेत्यांकडे बुधवारी सर्वाधिक गर्दी दिसून आली. थंडीच्या गारठ्यामुळे सर्वांना उबदार कपड्यांची गरज भासू लागली आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस तापमानातील घसरण सुरूच राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. थंड प्रवाह कायम राहिल्यास नागपूरसह संपूर्ण विदर्भात थंडी वाढण्याची शक्यता आहे.