सुरेंद्रकुमार ठवरे
अर्जुनी मोरगाव,
Navegaon-Nagzira Tiger Project गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात मानव व वन्यजीव यांच्यात रोज वाढणारा संघर्ष हाताळण्यासाठी वन विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. परिसरात कधी रानटी हत्तीचा वावर असतो तर कधी बिबट्या आणि वाघांकडून जनावरांच्या फडशा पडला जातो तथा मनुष्यहानी होते. त्यामुळे क्षेत्रीय कर्मचार्यांवर प्रचंड ताण वाढला आहे. अनेक वनाधिकारी व कर्मचार्यांकडे अतिरिक्त प्रभार आहे. मनुष्यबळ अभावी हा विभाग पंगू झाला आहे.
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये गेल्या काही वर्षात वन्यजीवांचा वावर वाढला असून त्यानुसार मनुष्य वन्यजीव संघर्षाची प्रकरणीही वाढत आहेत. जागरूकता व वन्यजीव संरक्षण कायद्याच्या प्रसारामुळे वन्य प्राण्यांच्या ठिकाणी शिकारीचे प्रमाण खूप घटले आहे. त्यामुळे बिबट व वाघ यांच्या संख्येत वाढ झाली असून जंगल क्षेत्र कमी पडत आहेत. अशा परिस्थितीत बफर क्षेत्र वाढीबरोबरच त्या भागातील वन्य प्राण्यांची दुसर्या जंगलात स्थानांतरण करण्याची गरज भासू लागली आहे. व्याघ्र प्रकल्पासाठी २०१७ पासून बफर क्षेत्रातील प्रशासनाचे कार्य सुरळीत चालले असले तरी काही ठिकाणी अधिकार्याची कमतरता कर्मचारी तसेच यंत्रणेला लागणारी वेळेवरची साधनसामग्री उपलब्ध नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे जंगलपट्ट्यातील गावांमध्ये मानव-वाघ-बिबट संघर्षाची प्रकरणे अधिक प्रमाणात वाढत आहेत. मनुष्य वन्यजीव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ३१ नवीन पदे निर्माण करण्याची गरज या प्रकल्पात आहे. प्रशासन मजबूत करण्यासाठी बफर पथकांसाठी एकूण ३१ नवी पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे यामध्ये वनसंरक्षक, वनपरिक्षेत्राधिकारी, चालक, तांत्रिक कर्मचारी आदींचा समावेश आहे. नवीन मनुष्यबळ उपलब्ध झाल्यास संघर्ष निवारण, बचाव कार्य, तात्काळ प्रतिसाद पथके आणि गावातील जनजागृती उपक्रम अधिक प्रभावी होणार आहे. सध्या मनुष्य वन्यजीव संघर्षाच्या घटनांचे प्रमाण वाढल्याने वन विभागावर अतिरिक्त ताण येत आहे. वाघ, बिबट, अस्वल यांच्या हालचाली वाढल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण आहे. अशा वेळी कडक नियंत्रण, वेगवान प्रतिसाद आणि नेमकी माहिती देणे गरजेचे असल्याचे वनाधिकार्यांनी सांगितले.
मनुष्य वन्यजीव संघर्षासाठी विशेष पथके, ३१ नवीन अधिकार्यांची नियुक्ती, गस्त, बचाव व नियंत्रणांसाठी आधुनिक साधन सामग्री, पर्यटन व्यवस्थापनातील सुधारणा, स्थानिक युवकांना प्रशिक्षण व रोजगार संवदेनशील गावांमध्ये त्वरित प्रतिशात केंद्रे याचीच अधिक गरज आहे.
- प्रीतमसिंग कोडापे
क्षेत्र संचालक, नवेगाव-नागझिरा व्याघ्र संरक्षण प्रकल्प
चौकट...
पर्यटनातून रोजगार निर्मिती
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पामुळे गेल्या काही वर्षात स्थानिकांना पर्यटन आणि वनसंवर्धनाशी निगडीत रोजगार मिळू लागले आहेत. परिसरात सफारी, गाइडिंग, होम स्टे, जंगल ट्रेल्स, बोटिंग आदीमुळे युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार एकट्या नवेगावबांध सरोवर प्रकल्पात दरवर्षी लाखो पर्यटक येत असून स्थानिक अर्थव्यवस्थेला यातून मोठी चालना मिळते. वन्यजीव संरक्षण आणि पर्यटन यांचा समतोल राखला तर क्षेत्रातील जतन आणि स्थानिकांचा विकास दोन्ही साध्य होऊ शकते.