कांकेर,
Naxalite surrenders in Kanker छत्तीसगडमध्ये आणि महाराष्ट्रात नक्षलविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले असून, कांकेर परिसरात दहशत निर्माण करणारी ‘मंजुळा’सह तिघा नक्षलवाद्यांनी शेवटी आत्मसमर्पणाचा मार्ग स्वीकारला आहे. बुधवारी कांकेर जिल्ह्यात तब्बल २.३ दशलक्ष रुपयांच्या बक्षीसासह चार नक्षलवाद्यांनी एसपी आय. कल्याण एलिसेला आणि बीएसएफच्या पथकासमोर शस्त्रास्त्रांसह आत्मसमर्पण केले. समर्पण करणाऱ्यांमध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. मंजुळाच्या नावाने संपूर्ण कांकेर जिल्हा हादरत असे. अनेक वर्षे जंगलात लपून सुरक्षा दलांवर हल्ले घडविण्यात तिचा हात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, महाराष्ट्रातील गडचिरोलीतही नक्षलविरोधी कारवाईत मोठी प्रगती नोंदवण्यात आली. येथे ८२ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर असलेल्या सात नक्षलवाद्यांनी अधिकाऱ्यांसमोर शरणागती पत्करली. एका दिवसात एकूण अकरा नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याने दोन्ही राज्यांतील सुरक्षा यंत्रणांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मार्च २०२६ पर्यंत देशातून नक्षलवाद पूर्णपणे नष्ट करण्याचे लक्ष्य निश्चित केले असून, त्या काळावधीत आता चार महिन्यांपेक्षा कमी वेळ उरला आहे. या पार्श्वभूमीवर झालेली ही महत्त्वाची प्रगती नक्षलदमन मोहिमेला बळकटी देणारी ठरत आहे.