मुंबई,
Prajakta Mali AI photos मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळीला सोशल मीडियावर प्रचंड चाहतावर्ग लाभला आहे. इन्स्टाग्रामवर सतत सक्रिय राहून फोटो, व्हिडीओ आणि आपल्या आयुष्याशी संबंधित क्षण चाहत्यांसोबत शेअर करणारी प्राजक्ता, नेहमीच सकारात्मक संवादासाठी ओळखली जाते. मात्र तिच्या एका फॅन पेजवर पोस्ट झालेल्या एआय जनरेटेड फोटोमुळे ती संतापली असून तिने चाहत्यांना विशेष विनंती केली आहे.
प्राजक्ताच्या एका फॅन क्लबने अलीकडेच तिचा कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून तयार केलेला फोटो पोस्ट केला. हा फोटो दिसायला आकर्षक असला तरी तो पाहून प्राजक्ता नाराज झाली. आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीत तिने स्पष्ट शब्दांत सांगितले की ती एआय जनरेटेड फोटो आणि व्हिडीओंचे समर्थन करू शकत नाही. “हा फोटो कितीही सुंदर दिसत असला तरी कृपया असे एआय फोटो बनवू नका,” अशी विनंती करत तिने सर्व फॅन क्लबसह चाहत्यांना थांबण्याचे आवाहन केले.
सध्या एआय Prajakta Mali AI photos तंत्रज्ञानाचा वाढता वापर मनोरंजन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. एआयच्या मदतीने सेलिब्रिटींचे संपादित किंवा मॉर्फ केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. परंतु या तंत्रज्ञानाचा गैरवापरही गंभीर स्वरूपात वाढताना दिसतो आहे. त्यामुळे अनेक कलाकारांनी एआय जनरेटेड कंटेंटविरोधात आवाज उठवला असून त्यात अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन, अक्षय कुमार, हृतिक रोशन, अनिल कपूर, करण जोहर आणि सुनील शेट्टी यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. व्यक्तिमत्त्व हक्कांचे आणि गोपनीयतेचे रक्षण करण्यासाठी या कलाकारांनी न्यायालयातही धाव घेतली आहे.प्राजक्ता माळी सध्या अभिनयासोबतच आपल्या व्यवसायामुळेही चर्चेत आहे. ‘प्राजक्तराज’ या स्वतःच्या दागिन्यांच्या ब्रँडमधून ती सक्रियपणे काम करते. तसेच कर्जत येथे असलेले तिचे फार्महाऊस पर्यटकांना राहण्यासाठी भाडेतत्त्वावर दिले जाते. अभिनय, व्यवसाय आणि सोशल मीडिया या तिन्ही क्षेत्रांत लोकप्रियता मिळवणाऱ्या प्राजक्ताने आता एआयच्या गैरवापराबाबत घेतलेली ठाम भूमिका अनेक चाहत्यांना विचार करायला लावणारी ठरली आहे.